आश्वी । झुंजार न्यूज 

 

 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार खोटेपणा आणि फसवणुकीने सत्तेवर आले असून, सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई ही मराठी माणसाची असून, ती गुजरातच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारवर तोफ डागली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, रणजितसिंह देशमुख ,  बुवाजी पुणेकर , राहुल खेमनर , विक्रम थोरात , संतोष नागरे , नवनाथ महाराज गागुंर्डे , बाळासाहेब पुंड , उपस्थित होते.

 

मांसबंदीच्या निर्णयावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण-भात खाऊन युद्धावर जात नव्हते, त्यांना शौर्यासाठी विशिष्ट आहाराची गरज होती असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला नामर्द आणि नपुंसक करत आहेत असा थेट आरोप त्यांनी केला.

 

मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये प्रशासकांची नियुक्ती झाल्याने हे सर्व खासगीरित्या फडणवीसांच्या ताब्यात असल्याचा दावा करत, मांसबंदीसारखे निर्णय सरकारचेच आहेत, असे राऊत म्हणाले. स्वातंत्र्य दिन हा शौर्याचा दिवस आहे, तो साजरा करण्याऐवजी सरकार लोकांच्या खाण्यापिण्यावर बंदी घालत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

संजय राऊत यांनी भाजपवर मुंबईचे महत्त्व कमी करून गुजरातला फायदा पोहोचवल्याचा आरोप केला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई असून, मुंबईला गुजरातच्या ताब्यात जाण्यापासून रोखण्यासाठी नियोजन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय मराठी भाषिक नेत्यांच्या विरोधामुळे मागे घेतला, याला राऊत यांनी ‘विजय उत्सव’ म्हटले. तसेच, शौर्य आणि मांसबंदीच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप नेत्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. भाजपने केवळ राजकीय स्वार्थासाठी सावरकरवादाचा वापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

महाविकास आघाडी आणि आगामी निवडणुका
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीमार्फत एकत्रितपणे लढवण्याचे संकेत राऊत यांनी दिले. मात्र, महाविकास आघाडीमध्ये चर्चा होवून निर्णय होईल असे ते म्हणाले .

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये ४० लाखांहून अधिक संशयित मतदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे . एकाच पत्त्यावर अनेक मतदार नोंदवले गेल्याचे आणि बनावट मतदार तयार केल्याचे पुरावेही त्यांनी सादर केले आहेत. याच मुद्द्यावर बोट ठेवत राऊत म्हणाले की, राज्यातील ५८ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसतानाही ते निवडून आले, हा मोठा फसवणुकीचा प्रकार आहे. राहुल गांधींच्या दाव्यांची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून, त्यांच्याकडून अधिक तपशील मागवण्यात आला आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *