आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील शासकीय गायरान आणि गुरे चरण गट नंबर ५ मधील जागेवर सोमनाथ जोरी नामक व्यक्तीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अवैध बांधकाम केल्याचा गंभीर आरोप गावातील जागरूक नागरिक तथा सामाजिक कार्यकर्त मोहित गंगाधर गायकवाड यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करून ते पाडण्यात यावे, अशी मागणी मोहीत गायकवाड यांनी प्रशासनाकडे केली आहे.

मोहित गायकवाड यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले की , १६ जुलै २०२५ रोजी आश्वी खुर्द ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकाराखाली अर्ज करून जानेवारी २०२४ पासून ते ४ जुलै २०२५ पर्यंतच्या सर्व मासिक मीटिंगच्या प्रोसेडिंगच्या प्रती मिळवल्या होत्या. तब्बल २२५ पानांच्या या कागदपत्रांच्या तपासणीतून असे समोर आले आहे की, ग्रामपंचायतीच्या एकाही मासिक सभेमध्ये गट नंबर ५ मधील जागा सोमनाथ जोरी यांना भाडेतत्त्वावर देण्याबाबत किंवा कोणत्याही प्रकारची परवानगी देण्याबाबत कोणताही ठराव मंजूर झालेला नाही. याचाच अर्थ हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असून, ग्रामपंचायतीच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे .

मोहीत गायकवाड यांच्या मते, शासकीय गायरान जमिनीवर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करणे हा गंभीर गुन्हा असून, यामुळे सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जमिनीचा अपहार होत आहे. ग्रामस्थांना गुरे चारण्यासाठी आणि इतर सार्वजनिक कामांसाठी ही जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत, मोहित गायकवाड यांनी मुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री , तसेचं जिल्हाधिकारी, संगमनेर येथील प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडून शासकीय जागेचा ताबा परत घेण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते आणि कोणती कारवाई करते, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
