मुंबई । झुंझार न्यूज

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ महाराष्ट्राने पटकावला असून, हा बहुमान राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला आणि अहोरात्र कार्याला समर्पित करत असल्याची भावना राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष समारंभात महामहीम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू जी यांच्या हस्ते महाराष्ट्राला जलव्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत आल्यावर मा. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना या पुरस्काराचे श्रेय दिले.

देवेंद्रजीच खरे मानकरी

यावेळी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, “जलसंपदामंत्री या नात्याने हा पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य मला लाभले असले, तरी या यशाचे खरे मानकरी आणि शिल्पकार मा. देवेंद्रजी फडणवीस हेच आहेत. त्यांची दूरदृष्टी, राज्याप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा आणि परिणामकारक निर्णयक्षमता यामुळेच २०२४ सालात जलसंपदा विभागात आमूलाग्र बदल घडवून आणणे शक्य झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्राने जलव्यवस्थापन क्षेत्रात देशात अव्वल स्थानी झेप घेतली आहे.”

जलसंपदा विभागाची गरुडझेप

मागील काही वर्षांत महाराष्ट्रात जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. जलयुक्त शिवार असो किंवा जलसंपदा विभागातील प्रशासकीय सुधारणा, देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या निर्णयांमुळे राज्याची पाणी साठवण क्षमता आणि पाण्याचे नियोजन यात मोठी सुधारणा झाली आहे.

भविष्यातील संकल्प

हा पुरस्कार केवळ सन्मान नसून ती एक जबाबदारी असल्याचे सांगत ना. विखे पाटील यांनी पुढे नमूद केले की, “मा. देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभाग भविष्यातही अधिक वेगाने आणि जबाबदारीने काम करेल. महाराष्ट्र जलव्यवस्थापनात केवळ आजच नाही, तर कायम अव्वल राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *