शिर्डी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाच्या शिर्डी नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांनी वेळेचा सदुपयोग करत आतापासूनच प्रत्येक प्रभागात वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिला आहे.
एकमेव अर्ज असल्याने उमेदवारी निश्चित
शिर्डी नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून सौ. जयश्रीताई थोरात यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, भाजपाकडून दाखल झालेला हा एकमेव अर्ज आहे. पक्षातर्फे अन्य कोणीही उमेदवारीसाठी अर्ज न केल्याने जयश्रीताईंची उमेदवारी ‘फायनल’ मानली जात आहे. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया केवळ एक औपचारिकता उरल्याने, त्यांनी यादी अंतिम होण्याची वाट न पाहता प्रचाराला सुरुवात केली आहे.
वेळ न घालवता मतदारांशी थेट संवाद
. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी मिळणारा वेळ अत्यंत कमी असतो. हे ओळखून, सौ. जयश्रीताई थोरात यांनी वेळ न घालवता थेट जनतेत मिसळण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये पिंजून काढत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मतदारांशी त्या संवाद साधत असून, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. उमेदवारी निश्चित असल्याने त्या पूर्ण आत्मविश्वासाने मतदारांना सामोरे जात असल्याचे दिसून येत आहे.
विरोधकांपूर्वीच प्रचाराची पहिली फेरी
सामान्यतः उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडतो. मात्र, जयश्रीताईंच्या या नियोजनबद्ध आणि आक्रमक प्रचारामुळे भाजपाने विरोधकांच्या आधीच प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यांच्या या ‘स्मार्ट’ प्रचार नीतीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह संचारला असून, शिर्डीत कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागल्याचे चित्र आहे.