विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण होणे हीच काळाची गरज — पर्यवेक्षक दीपक चव्हाण

आश्वी । झुंझार न्यूज

 

“विज्ञान-गणित प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा प्रत्यक्ष फायदा त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक आणि करिअरच्या वाटचालीत होतो. प्रदर्शनांमध्ये विद्यार्थी स्वतःच्या कल्पना मांडतात, प्रयोग करतात व समस्यांचे निराकरण शोधतात. यामुळे त्यांच्यात तर्कशक्ती, विश्लेषणात्मक विचार आणि सर्जनशीलता विकसित होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची दिशा मिळते,” असे प्रतिपादन विद्यालयाचे पर्यवेक्षक दिपक चव्हाण यांनी विज्ञान-गणित प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी केले.

रयत शिक्षण संस्थेचे अश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, अश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथे शालेय विज्ञान व गणित प्रदर्शनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना चव्हाण पुढे म्हणाले की,“विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलतेला आणि नवोन्मेषी विचारांना चालना दिली तर विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा असेल. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकातील ज्ञान अपुरे आहे. प्रयोगशीलता आणि नवकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे. विज्ञान-गणित प्रदर्शन ही विद्यार्थ्यांसाठी त्यांची क्षमता दाखविण्याची उत्तम संधी आहे. अनेक शाळांमधून येणारी अभिनव प्रकल्पसादरीकरणे ही आपल्या नव्या पिढीची बौद्धिक ताकद दाखवितात.”

 

 

 

६० विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण उपकरणे

यंदाच्या प्रदर्शनाचा मुख्य विषय “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM (STEM for Vikasit and Atmanirbhar Bharat)” असा होता.शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उद्योनमुख तंत्रज्ञान, गणितीय मॉडेलिंग, आरोग्य-स्वच्छता, जलसंवर्धन व व्यवस्थापन या क्षेत्रांवर आधारित 60 विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण मॉडेल्स, उपकरणे आणि प्रयोगांचे सादरीकरण केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांनी ग्रामस्थ, पालक, शिक्षक व उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या विज्ञानावरील आस्था, कल्पकता आणि प्रात्यक्षिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक झाले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यालयाचे प्राचार्य वडितके डी. के. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

 

 

उद्‌घाटन आणि परीक्षण

प्रदर्शनाचे औपचारिक उद्‌घाटन पर्यवेक्षक दिपक चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक रमेश थेटे, सहाणे बी. एम. यांच्या हस्ते संपन्न झाले.स्पर्धेचे परीक्षण सहाणे बी. एम., प्रशांत वाळुंज, महारुद्र तांबे, सुवर्णा वाकचौरे व भरती बागुल यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन, समस्यांचे नवोन्मेषी समाधान आणि सादरीकरणातील परिपक्वतेचे विशेष कौतुक केले.

 

तालुकास्तरीय प्रदर्शनासाठी निवड

या प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांची निवड आगामी 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन शिक्षण महर्षी गुलाबराव जोंधळे माध्यमिक विद्यालय, तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथे आयोजित करण्यात येणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विज्ञान-गणित प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीला चालना

शाळा-महाविद्यालयांमध्ये आयोजित होणाऱ्या विज्ञान-गणित प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित होण्यास मोठी मदत होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगशीलता, विचारमंथन आणि नवकल्पनांचा अनुभव मिळतो.

सुवर्णा वाकचौरे, परीक्षक

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *