संगमनेरमध्ये जलयात्रेचे जल्लोषात स्वागत; मान्यवरांच्या हस्ते महाआरती

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

महाराष्ट्रातील अनेक गावे आजही दुष्काळाच्या झळा सहन करत आहेत. या गावांतील पाणीटंचाई दूर होऊन राज्य दुष्काळमुक्त व्हावे, यासाठी “गोदा ते नर्मदा” या जलयात्रेच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाबाबत मोठी जनजागृती निर्माण होईल, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

संगमनेर शहरात या जलयात्रेचे आमदार अमोल खताळ व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने घुलेवाडी येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. घुलेवाडी फाटा, संगमनेर महाविद्यालय ऑरेंज कॉर्नर, गणेशनगर आणि बसस्थानक परिसरात ढोल-ताशांच्या गजरात तसेच बालवारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या निनादात जलयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. प्रवरामाईची आरती आमदार अमोल खताळ व त्यांची पत्नी नीलम खताळ, तसेच भाजप किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस रवींद्र थोरात व त्यांच्या पत्नी मीनाक्षी थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी जलसंपदा विभागाचे अधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार पडळकर म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथून सुरू झालेल्या या जलयात्रेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः वारकऱ्यांसोबत सहभागी झाले असून पुढील पाच दिवस ते या यात्रेत सहभागी राहणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जलव्यवस्थापन व लोककल्याण या दोन्ही क्षेत्रांत मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्यकाळात उभारलेल्या अनेक बारवांमध्ये आजही पाणी उपलब्ध आहे. त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही जलयात्रा राज्यातील दुष्काळाची समस्या दूर करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा तालुक्यातील जनतेच्या बळावर बलाढ्य शक्तीला पराभूत करून आमदार होतो आणि रात्रंदिवस जनतेसाठी काम करतो. अशा सक्षम लोकप्रतिनिधींच्या पाठीशी जनतेने भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. तालुक्यात आमदार अमोल खताळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने केलेले स्वागत पाहून आम्ही भारावून गेलो.”

— गोपीचंद पडळकर (आमदार)

……………………………………….

 

“जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्याला या यात्रेचे स्वागत करण्याची संधी दिली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जलयात्रा रात्री उशिरा संगमनेरला पोहोचली तरी नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. या यात्रेत सहभागी भाविकांच्या हस्ते प्रवरामाईची महाआरती करण्यात आली असून पुढील पाच दिवस ही महाआरती सुरू राहणार आहे.”

— अमोल खताळ (आमदार)

……………………………………..

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *