मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन राज्याच्या प्रशासन व प्रकल्पांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी केंद्र सरकारकडून अपेक्षित मदतीबाबत एक पत्र दिले. ही बैठक राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरली, ज्यात महामार्ग, रेल्वे, मेट्रो व नदीजोड प्रकल्पांचा समावेश होता. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतल्याचे नमूद केलं. तसंच दिल्लीत आल्यानंतर ज्या चर्चा सुरु होतात त्याबाबतही वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत का गेले याबाबत महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातील नेत्यांनी भाष्य केलं होतं. त्यावर ते म्हणाले की रिकामटेकड्या लोकांना काय पतंग उडवायचे ते उडवू द्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी उत्तम चर्चा झाली-फडणवीस

 

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. राज्यातील प्रशासन आणि प्रकल्प यासंदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारचे काही प्रकल्प सुरु आहेत त्याची माहिती मी त्यांना दिली. एकूणच केंद्र सरकारकडून काय मदत अपेक्षित आहे ते मी त्यांना सांगितलं. आम्ही जेव्हा मदत मागतो, चर्चा करतो तेव्हा ती चांगली चर्चा होत असते. तशी आजही ती चर्चा उत्तम प्रकारे झाली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. जायकाला आपण एक प्रस्ताव दिला आहे त्यासंदर्भातली ही भेट होती. त्यांनी ज्या सूचना मला दिल्या त्यादेखील आम्ही हो म्हटलं आहे. तसंच मी भुपेंद्र यादव यांनाही भेटलो. पर्यावरण आणि वनं यासंदर्भातल्या काही मंजुरी आहेत त्याची माहिती मी त्यांना दिली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अनेक रिकामटेकडे लोक आहेत, काय चर्चा करायच्या त्या करु द्या-फडणवीस

तुम्ही दिल्लीत आल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दिल्लीत असलो तरीही चर्चा होतात. मुंबईत असलो तरीही चर्चा होतात. मला वाटतं आहे की अनेक रिकामटेकडे लोक आहेत त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतं त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. ज्या कुणाला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, जी काही पतंगबाजी करायची आहे ती करुद्या. मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आहे आणि ती करत राहणार आहे. अनेक लोकांना वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.