अकोले तालुक्याच्या औद्योगिक विकासाचा कणा असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री कर्मवीर दादासाहेब रुपवते यांचे योगदान पुसण्याचे काम विद्यमान संचालक मंडळाकडून होत असल्याचा खळबळजनक आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल फाऊंडेशनने केला आहे. कारखान्याच्या वार्षिक अहवालात दादासाहेबांचा फोटो आणि नावाचा उल्लेख टाळल्याबद्दल समाजाने तीव्र संताप व्यक्त करत चेअरमन सीताराम पाटील गायकर यांना निवेदन सुपूर्द केले.
योगदान विसरल्याचा आरोप
निवेदनात म्हटले आहे की, १९९२ साली संगमनेर आणि अकोले यातील कायदेशीर अंतर बसत नसतानाही, अकोले हा आदिवासी भाग असल्याचे सांगून दादासाहेब रुपवते यांनी शरद पवार व अन्य नेत्यांच्या सहकार्याने विशेष बाब म्हणून हा कारखाना मंजूर करून आणला होता. दादासाहेब हे कारखान्याचे पहिले मुख्य प्रवर्तक आणि संस्थापक अध्यक्ष होते. मात्र, कारखान्याचा वार्षिक अहवाल छापताना त्यांचा साधा फोटोही न छापणे, ही समाजाची दिशाभूल असून त्यांचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
फाऊंडेशनच्या प्रमुख ५ मागण्या:
१. कर्मवीर दादासाहेब रुपवते यांची प्रतिमा एमडी कार्यालय आणि मीटिंग सभागृहात तातडीने बसवण्यात यावी. २. २०२६-२७ चा (चालू) वार्षिक अहवाल पुन्हा छापून त्यात दादासाहेबांचा ‘संस्थापक अध्यक्ष’ म्हणून सन्मानपूर्वक उल्लेख करावा. ३. कारखान्याच्या मीटिंग सभागृहाला ‘कर्मवीर दादासाहेब रुपवते’ यांचे नाव देण्यात यावे. ४. कारखाना आदिवासी क्षेत्रासाठी मंजूर झाल्याने अहवालात क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्यासह महापुरुषांचे फोटो प्रसिद्ध करावेत. ५. कारखाना आवारात दादासाहेब रुपवते यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे.
यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी समाजाच्या भावनांची दखल घेतली. “पुढील काळात या त्रुटी सुधारल्या जातील,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला. यावेळी तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, व्हाईस चेअरमन सुनीताताई भांगरे, संपूर्ण संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
या प्रसंगी विजयराव वाकचौरे, उत्कर्षाताई रुपवते, शांताराम संगारे, रमेश शिरकांडे , शिंदे , राजेंद्र गवांदे यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “कारखाना सध्या अडचणीत असून तो वाचवण्यासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून आम्ही एकजुटीने उभे राहू, मात्र महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.