संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
संगमनेर । झुंझार न्यूज
1500 लिटर पासून सुरू झालेला दूध संघ आज चार लाखापर्यंत संकलन करत आहे. प्रत्येक टप्प्यावर यशस्वी वाटचाल झाली आहे. मुक्त संचार गोठा व मुरघास ही राज्याला दिलेली आपली देन आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे मोठे संरक्षण असल्याने खाजगी वाले भाव देतात. म्हणून ही शेतकऱ्यांची संस्था आपण जपली पाहिजे. निर्भीळ व गुणवत्तेचे दूध हे वैशिष्ट्य असल्याने राजहंस हा गुणवत्तेचा व विश्वासाचा अस्सल ब्रँड बनला असल्याचे गौरवउद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख हे होते तर व्यासपीठावर मा. आ. डॉ सुधीर तांबे, बाजीराव पा.खेमनर, पांडुरंग पा. घुले, डॉ जयश्रीताई थोरात, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, आर.बी. राहणे रामदास पा वाघ, गणपतराव सांगळे, शरद नाना थोरात, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, संचालक विलासराव वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुराडे, बादशहा वाळुंज , संजय पोकळे, विक्रम थोरात, रमेश गुंजाळ, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे, भारत शेठ मुंगसे, डॉ प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलाडी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 49 वर्षांची दुध संघाची वाटचाल ही यशस्वी राहिली आहे .प्रत्येक टप्प्यावर आपण पुढे गेलो .गुणवत्ता हे वैशिष्ट्य असल्याने गुलबर्गा ते सुरत, चंद्रपूर ,अमरावती, नागपूर या ठिकाणी राजहंस दुधाला मोठी मागणी आहे. स्पर्धेत आपण आहोत म्हणून खाजगी वाले भाव देत आहेत. ही शेतकऱ्यांची संस्था आहे तिचे मोठे संरक्षण नागरिकांना मिळत आहे.
संघामुळे गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला असून संघाने आगामी काळात बेकरी उत्पादनाबरोबर गुणवत्ता वाढीसाठी काम करावे
याचबरोबर तालुक्यामध्ये सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. वीज जाते म्हणजे पाणी जाते. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. त्यावेळेस कोणी मदत केली नाही. आता लाईट बंद केली जाते म्हणजे पाणी पुढे जाते. याबाबत नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे. कारण काही लोकांना तालुक्याची घडी मोडायची आहे. हा तालुका टिकला पाहिजे.
काही लोक टीका करतात की भावी मुख्यमंत्र्याचा पराभव केला. या शब्दापर्यंत पोहोचण्याकरता विश्वास आणि कष्ट करावा लागतात. पत्रकार परिषदा सध्या खूप वाढल्या आहेत. हा सहकार गरिबांनी कष्टातून उभा केला आहे. तो उध्वस्त करण्याची भाषा केली जात आहे. फ्लेक्सबाजी पाहून लोकांना विट येतो आहे. हा पैसा येतो कुठून हा मोठा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांचे मूलभूत प्रश्न ऐवजी वाळू आणि मुरमाकडे लक्ष आहे. तालुक्यात गुंडगिरी वाढली आहे. हे अत्यंत दुर्दैवाचे वातावरण सध्या तालुक्यात आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार निर्णय घेत नाही. शेतकऱ्यांना खते मिळत नाही. आपल्या मंत्रिपदाच्या काळात असे काही नव्हते. आता झेन जी जागृत झाली असून जाती धर्माचे राजकारण त्यांना नको आहे विकास शिक्षण भविष्य याबाबत ते विचारत आहे. नागरिकांना ही जागृत व्हावे लागेल प्रत्येकाला लढावे लागेल असे ते म्हणाले
तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाच्या माध्यमातून सुमारे 608 कोटींची उलाढाल झाली असून 500 कोटी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खिशात गेले आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण झाला. पन्नास वर्षांची दूध संघाची वाटचाल ही कायम चढत्या दराने राहिली आहे. मागील वर्षी सरासरी 38 रुपये दर दिले असून सध्या 41 रुपये प्रति लिटर उच्चांकी दर दिला जात आहे.
दूध संघाने टाटा कंपनीचे सोलर बसवले असून त्यातून महिन्याला पंधरा ते वीस लाख रुपयांची वीज निर्मिती होऊ शकते. वाहतूक व्यवस्था सुधारली आहे . आगामी काळात उपपदार्थ निर्मिती वाढ करण्यासाठी प्राधान्य असेल असे सांगताना मिशन 50 लिटर हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी ध्येय ठेवले आहे. दुष्काळाचे गांभीर्य ओळखून सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले
तर मा आ डॉ सुधीर तांबे म्हणाले की, देशातील दूध क्रांतीमध्ये डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. राजहंस दूध संघाच्या मोठा लौकिक असून मिशन 50 लिटर हे अभियान कौतुकास्पद आहे .शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढवली पाहिजे सहकारावर निष्ठा ठेवा सहकार जपा असे आवाहन त्यांनी केले.
तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की ,दूध व्यवसायामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. दूध व्यवसायातून तालुक्यात समृद्धी आली आहे कारखाना हा वडिलांची भूमिका करतो. तर दूध संघ आईप्रमाणे काळजी घेतो. खाजगी संघांशी आपल्या संघाची मोठी स्पर्धा असून आपला सहकार टिकवला पाहिजे. वाढवला पाहिजे आणि तालुका वाचवला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
यावेळी अविनाश सोनवणे ,सुभाष सांगळे, के.के. थोरात, सुहास आहेर, सौ अर्चना बालोडे, नानासाहेब शिंदे, सुरेश थोरात, साहेबराव गडाख, मोहन करंजकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांचा व व्यक्तींचा सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
या वार्षिक सभेचे स्वागत व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर यांनी केले .नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर विक्रम राजे थोरात यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील शेतकरी दूध उत्पादक सभासद व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुकाराम मुंडे यांच्या भूमिकेला पाठिंबा–रणजीतसिंह देशमुख
तुकाराम मुंडे यांनी घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. यामुळे बनावट दूध निर्माण करणाऱ्यांना मोठी चपराक बसली असून वीस ते पंचवीस टक्के दूध कमी झाले .याचबरोबर भेसळयुक्त पनीर कमी झाले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यांच्या भूमिकेमुळे राजहंस दूध संघाची विक्री वाढली आहे. गुणवत्ता हेच वैशिष्ट्य आपले राहिले असल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले असून त्यांनीच शासकीय स्तरावर कायम हा विभाग सांभाळावा अशी मागणी करताना त्यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे म्हणताच उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.











