मुलींचा संघ द्वितीय, तर मुलांचा संघ तृतीय

संगमनेर । झुंझार न्यूज

जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमृतनगर, संगमनेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. स्पर्धेत शाळेच्या १७ वर्षांखालील (U-17) मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
             

दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. खेळाडूंची मेहनत, शिस्त, सांघिक भावना आणि जिंकण्याची जिद्द या यशातून अधोरेखित झाली. विद्यार्थ्यांनी मैदानावर दाखवलेली जिद्द आणि खेळातील कौशल्य यामुळे अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या क्रीडा गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली.
              

मुलींच्या संघाचे नेतृत्व कर्णधार कु. जोशना भोये हिने, तर मुलांच्या संघाचे नेतृत्व कर्णधार साई बोडके याने केले. दोन्ही संघांना शाळेचे क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक रविंद्र कदम, जयराज दुशिंग, रोहित गाडे आणि वृशाली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि सांघिक समन्वयाच्या बळावर हे यश संपादन केले.

         

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षकवृंद आणि क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे आणि संगमनेरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
           

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, विश्वस्त अनिल शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. धुमाळ, शाळेचे प्राचार्य आशिष कुमार यांच्यासह सर्व विभागप्रमुख व शिक्षकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *