आमदार अमोल खताळ यांची माहिती; पाणीटंचाई, चारा आणि रोजगाराच्या प्रश्नांवर उपाययोजनांचा पाठपुरावा
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये, तसेच दुष्काळग्रस्त आणि गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, या माणुसकीच्या भावनेतून उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ‘ दिवाळीचा शिधा’ उपलब्ध झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या भागांतील गरजू कुटुंबांना लवकरच या शिध्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा, रोजगार हमीची कामे, अपूर्ण पाणीपुरवठा योजना आणि शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन टंचाई आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. ज्या गावांमध्ये प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, अशा गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. एखाद्या गावातून टँकर सुरू करण्याची मागणी आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता किंवा कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता तातडीने टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
येत्या काळात दुष्काळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तालुक्यातील जलस्रोत आणि उपलब्ध पाणीसाठ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहे. जलजीवन मिशन तसेच इतर पाणीपुरवठा योजनांची ७५ ते ८० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. या योजनांची उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. या योजना पूर्ण झाल्यास संबंधित गावांमधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होईल.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ टँकरवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर पाण्याचे स्रोत निर्माण करणेही गरजेचे आहे. त्यासाठी लहान-मोठे जलस्रोत विकसित करणे, विहिरींचे खोलीकरण करणे, तसेच नादुरुस्त पाइपलाइन आणि पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले.
पशुधनासाठी चारा-पाण्याचे नियोजन
मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तरतुदी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पशुधनासाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध राहावा, यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची देखभाल करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.