संगमनेर । झुंझार न्यूज
माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाली आहे. याचबरोबर सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय हा शेतीला पुरक व्यवसाय न राहता मुख्य व्यवसाय बनला आहे. दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, चढ-उतार निधी इत्यादी बाबींसाठी दूध उत्पादकांना सुमारे 50 कोटी रूपये अदा करण्यात आले असल्याची माहिती दूध संघाचे माजी चेअरमन व जिल्हा बँकेचे संचालक मा.रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर दूध संघाच्या वतीने वर्ग करण्यात आलेल्या पेमेंट बाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी स्व.भाऊसाहेब थोरात यांनी सन 1977 साली दूध संघाची स्थापना केली. त्यांच्या आदर्श विचारावर दूध संघाची यशस्वी वाटचाल चालू आहे. माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली दूध उत्पादकांच्या हिताची सातत्यपुर्ण काळजी घेतली जात असून दूध उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. मिशन 50 L च्या माध्यमातून 50 लिटर दुधाच्या गाई निर्माण करण्याचे महत्वकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. त्या माध्यमातून दुग्धव्यवसायात क्रांती निर्माण होणार आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्धव्यवसायाला फायदेशीर ठरतील असेच निर्णय घेतले जातात.

संघाने नेहमी दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. संगमनेर दूध संघाची वार्षिक उलाढाल 609 कोटी असून दूध उत्पादकांना वर्षभरामध्ये सुमारे 500 कोटी रूपये दूध खरेदी पोटी दिले जातात. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून नियमितपणे 15 दिवसाला पेमेंट होत असल्याने त्यातून दूध उत्पादकांचे व्यवस्थीतपणे अर्थकारण चालू असते. दिवाळीच्या निमित्ताने येणाऱ्या रक्कमेमुळे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत उलाढाल होत असते.

ग्रामिण भागातील होणाऱ्या या अर्थकारणावर शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. दूध उत्पादकांकडील रक्कम ही शहरातील व्यापाऱ्यांकडे विविध प्रकारच्या खरेदीच्या माध्यमातून हस्तांतरीत होत असते. त्यामुळे संपुर्ण तालुक्याचीच अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. तालुक्यातील सहकारी संस्थांमुळे संगमनेरची बाजारपेठ ही जिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ बनलेली आहे.

सद्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चाऱ्याची व पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. दूध उत्पादकांनी चाऱ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. दूध उत्पादकाच्या अडचणीच्या काळात संघाने सातत्याने मदत व सहकार्य केलेले आहे. शासनाने आपले स्तरावरून दुष्काळाचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

सहकारी चळवळ अधिक मजबूत करावयाची असल्यास दूध उत्पादकांनी सहकारी संघाला ताजे, स्वच्छ व निर्भेळ दुधाचा पुरवठा करावा व ग्राहकांनी देखील सहकारी दूध संघांनी निर्माण केलेले दर्जेदार व शुध्द राजहंस दुग्धजन्य पदार्थ खरेदी करावे असे अवाहन व्हा. चेअरमन मा. राजेंद्र पाटील चकोर यांनी केले.

या प्रसंगी दूध संघाचे संचालक लक्ष्मणराव कुटे, विलासराव वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे , बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, रमेश गुंजाळ, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रविंद्र रोहम, भारत मुंगसे, प्रमोद पावसे, सौ.प्रतिभाताई जोंधळे, श्रीमती मंदाताई नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.

दिवाळी गोड होणार
दरवर्षीप्रमाणे दीपावलीच्या निमित्ताने अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांनी सभासद शेतकरी उत्पादक कामगार यांचे विविध देयके बँकेत वर्ग केले आहे. यामुळे सभासद शेतकरी व नागरिक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हा सर्व पैसा बाजारपेठेत येणार असल्याने शहरातील व्यापारी आनंदी झाला आहे. यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांची दिवाळी गोड होणार असल्याने सर्व दूध उत्पादक कामगार शेतकरी यांनी दूध संघाचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 22

