संगमनेर । झुंजार न्यूज
राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून क्षेत्रफळाने मोठा असणार् या संगमनेर जिल्हा करावा, या न्याय्य मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक झालीय. या मागणीसाठी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन आणि मागील आंदोलनाचे स्मरणपत्र देण्यात येणार असून पुन्हा मोठे जनआंदोलन उभे करण्याचा पवित्रा संगमनेर जिल्हा कृती समितीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
संगमनेर जिल्हा व्हावा, यासाठी पुढील आंदोलनाचे स्वरूप व रूपरेषा ठरविण्यासाठी काल (दि. १८) शासकीय विश्रामगृहात सायंकाळी बैठक संपन्न झाली.
झालेल्या बैठकीत सर्वांनुमते प्रांताधिकारी यांना प्रथम स्वरूपात संगमनेर जिल्हा मागणीचे निवेदन तथा स्मरणपत्र देण्याचे ठरले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील इतर ही लोकप्रतिनिधींना अहमदनगरचे विभाजन करून संगमनेर जिल्हा व्हावा, या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून सर्व निकषात बसणारा संगमनेर जिल्हा करावा आणि अकोल्याच्या दुर्गम आदिवासी भागातल्या जनतेच्या सोयीसाठी सोयीस्कर असा संगमनेर जिल्हा करावा, ही 35 वर्षांची जुनी मागणी आक्रमकपणे पुढे आली आहे.
सन 2018 साली संगमनेर जिल्हा मागणीसाठी मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. नागरिकांची संगमनेर जिल्हा पाठिंब्यासाठी स्वाक्षरी मोहीम व साखळी उपोषणाची आठवण काढत आता त्याही पेक्षा वेळप्रसंगी मोठे जनआंदोलन उभे करण्याची चर्चा या नियोजन बैठकीत झाली.
संगमनेरच्या अस्मितेसाठी संगमनेर जिल्हा मागणीसाठी पुन्हा एकदा मोठया संख्येने सर्व पक्षीय लोकांनी संगमनेर तसेच अकोल्याच्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं आहे.
