सातारा । झुंजार न्यूज

 

लोकांना परिवर्तन हवे आहे, हे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेल्या गर्दीतून स्पष्ट होत आहे. देशात सध्या जे घडतेय त्याला पर्याय देण्यासाठी इंडिया आघाडीचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला राज्यातही प्रतिसाद मिळतोय. विदर्भातील वातावरण पुन्हा काँग्रेसच्या बाजूने वळले. त्याचा संपूर्ण राज्यात परिणाम जाणवेल. महाविकास आघाडीला राज्यातील एकूण जागांपैकी ६० ते ७० टक्के जागा मिळतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केला.

 

सातारा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार साताऱ्यात आले होते. अर्ज भरल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याचे स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतर मोठे योगदान आहे.

 

 

अनेक कर्तबगार लोकांची फळी या जिल्ह्यात होऊन गेली. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही जिल्ह्यातील लोकांवर आहे. आज अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहिले. त्यातून लोकांना देशात परिवर्तन हवे आहे हे स्पष्ट होते. त्यासाठीचे पहिले पाऊल आज साताऱ्यातून टाकले गेले. आमचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम आज सातारकरांनी केले.’

 

 

‘विदर्भ हा अनेक वर्षे काँग्रेसला पाठिंबा देणारा प्रदेश राहिला आहे. मागील काळात त्यात बदल झाला होता; परंतु आता विदर्भात काँग्रेसला अनुकूल वातावरण होईल. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यात दिसेल. मागच्या वेळेला सर्व विरोधी पक्षांना मिळून राज्यात केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. या वेळी महाविकास आघाडी आहे. अनेक घटक जोडले गेलेत. त्यामुळे राज्यातील एकंदर जागांपैकी ६० ते ७० टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, तरी मला आश्चर्य वाटणार नाही,’ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

 

 

मराठा समाजात राग

 

आया-बहिणींवर लाठीहल्ला झाल्याचा विचार करून मतदान करा, या मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनावर बोलताना पवार म्हणाले, ‘मी मराठवाड्यात गेलो होतो. तिथे लोकांच्यात राग आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्याबद्दल आस्था आहे, हे मला जाणवले; परंतु हा राग व आस्था मतांत किती रूपांतरित होईल, हे आताच सांगू शकत नाही.’ जरांगे तुमच्या व्यासपीठावर दिसतील का या प्रश्नावर ते म्हणाले, की माझी त्यांच्याशी फार ओळख नाही. त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी फक्त एकदा भेटलो आहे.

 

 

माढ्याची परिस्थिती सुधारलेली दिसते

 

माढा मतदारसंघातील उत्तम जानकर यांना विशेष विमानाने आमदार जयकुमार गोरे व खासदार निंबाळकर हे नागपूरला घेऊन गेले होते, यावर पवार म्हणाले, माढा मतदारसंघातून मी एकदा निवडणूक लढलो होतो. तो दुष्काळी भाग आहे; परंतु आता तेथील नेते स्पेशल विमानाने नागपूरला जात असतील, तर तेथील परिस्थिती सुधारलेली दिसत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

 

 

महिलांना सन्मान देणारे निर्णय

 

बारामतीत तुमच्या एका वक्तव्यावरून सुनेत्रा पवार भावनिक झाल्या होत्या. या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘मी तसे बोललो नव्हतो. अजित पवार भाषणात म्हणाले होते की मला निवडून दिले. ताईंना निवडून दिले. आता सुनेला निवडून द्या. पुढे त्यांनी काही वाक्ये वापरली. त्यासंबंधी मी फक्त स्पष्टीकरण केले. त्यापेक्षा वेगळे काही मला सांगायचे नव्हते.

 

महिला हिताच्या दृष्टीने त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेणारा या देशातील पहिला मुख्यमंत्री मी आहे. शासकीय सेवेत महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय मी घेतला. संरक्षणमंत्री असताना तिन्ही सेवा दलात मुलींना घेण्याचा निर्णय मी घेतला. महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल, अशीच भूमिका मी कायम घेतली आहे. महिलांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन समंजसपणाचा आहे

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *