निबे गृपच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ
शिर्डी । झुंझार न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या दूरदर्शी संकल्पनांना बळकटी देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आता देशाच्या संरक्षण नकाशावर ठळकपणे उमटणार आहे. शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये निबे गृपच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे (डिफेन्स क्लस्टर) उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते येत्या २३ मे २०२६ रोजी होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि निबे गृपचे संस्थापक गणेश निबे यांनी आज पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा गौरव करण्यात आला.
भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम
यावेळी बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “शिर्डीची भूमी आतापर्यंत केवळ ‘सबुरी आणि श्रद्धे’साठी ओळखली जात होती, मात्र आता ती ‘शक्ती’चे (संरक्षण उत्पादन) केंद्र म्हणूनही ओळखली जाईल. हा प्रकल्प देशाच्या खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील एक मैलाचा दगड ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे आणि मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला असून, यामुळे अहमदनगर जिल्ह्याला नवी औद्योगिक ओळख प्राप्त होईल.”
३००० तरुणांना मिळणार रोजगार
या संरक्षण प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे ३००० युवकांना रोजगाराची संधी मिळेल. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
१० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
निबे गृपचे गणेश निबे यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती देताना सांगितले की, “पंतप्रधान मोदींच्या स्टार्टअप संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या आमच्या समूहाने आतापर्यंत शिर्डी प्रकल्पात १००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भविष्यात ही गुंतवणूक अधिक वाढवण्यात येणार आहे. हा प्रकल्प अत्याधुनिक संरक्षण प्रणालींचे डिझाइन, विकास आणि उत्पादन करणारा देशातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू असेल.”
काय असणार प्रकल्पाचे स्वरूप?
२३ मे रोजी होणाऱ्या सोहळ्यात खालील महत्त्वाचे टप्पे पार पडणार आहेत: १. बॉम्ब शेल प्रकल्प: या प्रकल्पाचे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होईल. २. बायो सीएनजी प्रकल्प: पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे भूमीपूजनही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.
विद्यार्थी आणि लघुउद्योजकांसाठी मोठी संधी
हा केवळ एक औद्योगिक प्रकल्प नसून तो राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि लघुउद्योगांच्या (MSME) सक्षमीकरणाचा एक भाग आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, उदयोन्मुख अभियंते आणि लघु उद्योजकांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे तरुण पिढीला संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान जवळून पाहण्याची आणि शिकण्याची संधी मिळणार असल्याचे गणेश निबे यांनी नमूद केले.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध खात्यांचे मंत्री आणि संरक्षण क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पामुळे शिर्डी परिसर केवळ धार्मिक पर्यटनच नव्हे, तर ‘डिफेन्स हब’ म्हणून जागतिक स्तरावर नावारूपास येणार आहे.