साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘१२ ज्योतिर्लिंग’ यात्रेने सोमवारी दिमाखात नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. सुमारे १५०० भाविकांचा सहभाग असलेल्या या यात्रेचे भारत-नेपाळ सीमेवर अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रवासाच्या पुढील टप्प्यात आज सर्व भाविक काठमांडू येथील आराध्य दैवत भगवान पशुपतिनाथाचे दर्शन घेणार असून, संपूर्ण परिसरात सध्या अध्यात्मिक चैतन्य पसरले आहे.
सीमेवर भव्य स्वागत आणि आरती
बुधवार दि. २ सप्टेंबर सकाळी १० वाजता ही यात्रा भारत-नेपाळ सीमेवर पोहोचली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून सीमेवरील हॉटेल मानसरोवर येथे भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी या आरतीमध्ये सहभाग घेतला. या धार्मिक कार्यक्रमानंतर यात्रेचा ताफा काठमांडूकडे रवाना झाला. आज नेपाळची राजधानी काठमांडू येथे सर्व १५०० भाविक पशुपतिनाथ मंदिराच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.
विजयराव कोते यांची कर्तव्यनिष्ठा: कौटुंबिक संकट असूनही यात्रेचे यशस्वी सारथ्य
या यात्रेचे मुख्य आयोजक आणि साई निर्माण ग्रुपचे प्रमुख विजयराव कोते यांच्यासाठी हा प्रवास केवळ धार्मिक नसून परीक्षेचाही ठरला. प्रवासादरम्यान त्यांचे वडील तुळशीराम कोते यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मध्य प्रदेशातील इटारसी येथील रुग्णालयात दाखल करावे लागले होते. एका बाजूला वडिलांचे आजारपण आणि दुसऱ्या बाजूला १५०० भाविकांच्या यात्रेची जबाबदारी, अशा कठीण प्रसंगात विजयराव यांनी डगमगून न जाता धैर्याने निर्णय घेतले.
वडिलांची शुश्रूषा स्वतः काही दिवस थांबून केल्यानंतर, तिकडे यात्रेत कोणताही अडथळा येणार नाही याची त्यांनी चोख व्यवस्था केली. त्यांच्या अनुपस्थितीतही काशी विश्वनाथ (वाराणसी) आणि अयोध्या येथील राम मंदिर दर्शन सुविधेनुसार पार पडले. वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, विजयराव यांनी तातडीने उत्तर प्रदेशातील नौतनवा रेल्वे स्टेशनवरून प्रवास करून थेट भारत-नेपाळ बॉर्डर गाठली आणि पुन्हा यात्रेचे नेतृत्व हाती घेतले. संकटाच्या काळातही त्यांनी दाखवलेल्या या संयम आणि नियोजनाचे सर्व भाविक व कार्यकर्त्यांकडून कौतुक होत आहे.
नेपाळमधून ‘राष्ट्र सह्याद्री’ आणि ‘झुंझार न्यूज’चे थेट वार्तांकन
या भव्य यात्रेचे प्रत्येक अपडेट शिर्डीकरांपर्यंत आणि भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘राष्ट्र सह्याद्री’ माध्यम समूहाची टीम नेपाळमध्ये सक्रिय आहे. शिर्डी कार्यालय प्रमुख अशोक दुशिंग यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार राजेश गायकवाड आणि रामनाथ बोराडे हे दुर्गम भागातूनही यात्रेचे अचूक आणि वेधक वार्तांकन करत आहेत. काशी, अयोध्या ते नेपाळ असा प्रवास करत या टीमने प्रत्येक क्षणाची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल साई निर्माण टीमच्या वतीने त्यांचे विशेष स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
सध्या पशुपतिनाथ दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह असून, संपूर्ण नेपाळमध्ये साई निर्माणच्या या यात्रेने भक्तीचा मळा फुलवला आहे.