झरेकाठी । झुंझार न्यूज 

 


मृत्यूलोकात जन्म घेऊन जो कृष्णालाच आपले सर्वस्व मानतो, त्याच्या जीवनाचे सार्थक होते. कलियुगात रक्ताची नातीही स्वार्थापोटी दुरावू शकतात, पण भगवान श्रीकृष्ण हेच असे एकमेव नाते आहे, जे माता, पिता, बंधू आणि सखा म्हणून सदैव आपल्या पाठीशी उभे राहते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अश्विनीताई आकाश महाराज हारदे यांनी केले.

 

झरेकाठी येथे आयोजित करण्यात आलेल्या ४८ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात काल रात्री अश्विनीताई हारदे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. यावेळी आपल्या सुमधुर वाणीतून त्यांनी भक्तीरसाची उधळण करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

नात्यांमधील स्वार्थ आणि भगवंताचा आधार


कीर्तनासाठी त्यांनी “कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता। बहिण बंधू चुलता, कृष्ण माझा।।” हा अभंग घेतला होता. या अभंगाचे निरूपण करताना त्या म्हणाल्या की, आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात नातीगोती केवळ गरजेपुरती उरली आहेत. माणूस जेव्हा संकटात असतो, तेव्हा अनेकदा आपलीच माणसे पाठ फिरवतात. अशा वेळी भगवंत हाच जिवाचा खरा आधार असतो. मृत्यूलोकात आल्यावर ज्याने कृष्णाला आपले मानले, त्याला कशाचीही कमतरता भासत नाही, असे जीवनाचे सार त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले.

टाळ-मृदंगाच्या गजरात परिसर दुमदुमला


अश्विनीताईंच्या कीर्तनाला टाळ-मृदंग आणि पखवाजाची उत्तम साथ लाभली. त्यांच्या ओघवत्या शैलीतील विवेचनामुळे उपस्थित भाविक भक्तीत तल्लीन झाले होते. कीर्तनादरम्यान झालेल्या नामघोषाने संपूर्ण झरेकाठी परिसर ‘कृष्णमय’ झाला होता.

बाल वारकऱ्यांचा लक्षणीय सहभाग


या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे कीर्तनाला केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा महिलाच नव्हे, तर लहान चिमुकल्या वारकऱ्यांची देखील मोठी उपस्थिती होती. हातात टाळ घेऊन तल्लीन झालेल्या या बाल वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला आणि पुरुष भाविकांनी या भक्ती सोहळ्याचा लाभ घेतला.

झरेकाठी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित हा ४८ वा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून, अश्विनीताईंच्या कीर्तनाने या सोहळ्यात चैतन्य निर्माण झाले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *