मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुटुंबियांसमवेत घेतले महादेवाचे दर्शन

 

आश्वी । झुंझार न्यूज 

श्री क्षेत्र निझर्णेश्‍वर देवस्थानाचे रुपांतर आता अध्यात्मिक आणि धार्मिक पर्यटन स्थळामध्ये होत आहे. सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण होत असलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वाच्या योगदानाची अपेक्षा जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

श्रावण महीन्याच्या निमिताने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री क्षेत्र निझर्णेश्‍वर महादेवाचा अभिषेक करून दर्शन घेतले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्री विखे पाटील आणि कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. आमदार अमोल खताळ, शिवाजी जोंधळे, मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे, अहिल्यानगर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सचिन शिंदे, पप्पू गाडे यांच्यासह मंदिर विश्‍वस्त समितीचे सदस्यासह ग्रामस्थ देखील उपस्थित होते. यावेळी विश्‍वस्त आणि ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला.

श्री क्षेत्र निझर्णेश्‍वर येथे असलेल्या श्रध्देपोटी दरवर्षी आपण श्रावण पर्वात येत असतो. खासदार साहेबांनी सुध्दा एकही वर्ष चुकवले नाही. सर्व राजकीय निवडणुकांची सुरूवात सुध्दा या पवित्र स्थानावरून आपण करतो. त्यामुळेच या तिर्थस्थानाबद्दल असलेली श्रध्दा खूप वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.

निझर्णेश्‍वर परिसराचा विकास अध्यात्मिक आणि निसर्ग पर्यटनातून होत असून या ऐतिहसिक आणि पौराणिक मंदिराचा विकास होत आहे. सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून मंदिर आणि परिसराचा कायापलाट होणार आहे. अधिकचा निधी लागला तरी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

परिसरात वन विभागाच्या माध्यमातून बिबट सफारीचा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. दूधेश्‍वर डोंगराच्या परिसरात सुध्दा कार्यान्वित होणारा प्रकल्प पर्यटनाचे मुख्य केंद्र बनेल. मंदिर परिसराचा पाणी प्रश्न सौडविण्यासाठी काय उपाय योजना करता येईल यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या. आपल्या भागात पावसाची प्रतिक्षा अजून आहे. त्यामुळे अधिकचा पाऊस पडू दे आशी प्रार्थना श्री निझर्णेश्‍वर महादेव चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील महत्वाच्या प्रश्नांची झालेली सोडवणुक होत आहे. निझर्णेश्‍वर तिर्थस्थानाच्या विकासला गती मिळाली. तसेच, भोजापूर प्रकल्पाचा समावेश वैतरणा दमणगंगा गोदावरी नदीजोड प्रकल्पात करून दुष्काळी भागातील गावांना न्याय दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याप्रसंगी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी देणगी देण्याऱ्या व्यक्तिंचा सन्मान मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *