संगमनेरमध्ये टंचाई आढावा बैठक संपन्न; गैरहजर कर्मचारी आणि जलजीवनमधील भ्रष्टाचारावर मंत्री आक्रमक
आश्वी । झुंझार न्यूज
वाढत्या उन्हाचा तडाखा आणि खालावलेली पाणीपातळी यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला कडक शब्दांत तंबी दिली आहे. “ज्या गावांतून टँकरची मागणी येईल, तिथे विलंब न लावता तातडीने टँकर सुरू करा. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली, तर गाठ माझ्याशी आहे,” अशा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘टंचाई आढावा’ बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन आणि मनरेगा कामांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. केवळ टँकर सुरू करून चालणार नाही, तर त्या माध्यमातून पुरवले जाणारे पाणी शुद्ध आणि स्वच्छ असेल याची खातरजमा आरोग्य आणि संबंधित विभागाने करावी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
या बैठकीत विविध गावांतील कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्यावरून प्रशासनासमोर गाऱ्हाणे मांडले. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना अनेक ग्रामसेवकांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच बैठकीला दांडी मारणाऱ्या तलाठी आणि ग्रामसेवकांबद्दल पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा गैरहजर कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढील तीन-चार महिन्यांचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी ‘मनरेगा’ अंतर्गत जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून जलसंधारणाची शाश्वत कामे उभी राहतील, असेही विखे पाटील म्हणाले.
या बैठकीला आमदार अमोल खताळ, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या या कडक भूमिकेनंतर आता तालुक्यातील टंचाई निवारण कामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे अलर्ट मोडवर आली असून टँकर मंजुरीची प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे.
जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार : ना. विखे पाटील
तालुक्यातील अनेक गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजना अपूर्ण असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी बैठकीत प्राप्त झाल्या. यावर भाष्य करताना ना. विखे पाटील म्हणाले, “ज्या गावांत या योजना अपूर्ण आहेत किंवा निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे, तिथे ग्रामपंचायतीने ठराव करून लेखी तक्रार द्यावी. जर ग्रामपंचायत ठराव देत नसेल, तर गावातील ५०-६० नागरिकांनी सह्यांचे निवेदन द्यावे. दोषींवर आणि संबंधित कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाईल.”