आठ विदयमान आमदार तर चार नवे चेहरे !
शिर्डी l झुंजार न्यूज
गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची धादंल सुरु होती. जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवारांमध्येच खरी लढत होती. दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धुरळा उडाला. दोन दिवसांपूर्वीच मतदान झाले. निवडणूक चुरशीच्या झाल्या असल्याने सत्ताधारी आणि विरोधी उमेदवारांची आता धाकधुक सुरु झाली आहे. दोन्हीकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला कल देणार याची जनतेला उत्सुकता लागली आहे.

जिल्ह्यातील बारा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान झाले असून, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह दोन्ही आघाडीतील विद्यमान दहा आमदार आणि तीन माजी आमदारांसह १५१ उमेदवार विधानसभेसाठी नशीब अजमावत आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना (उबाठा) या तीन पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले होते. मात्र, महायुतीने लाडकी बहिण योजना लागू केल्यामुळे महाविकास आघाडीचे धाबे दणाणले आहे. या योजनेमुळे महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांत देखील उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

विधानसभा निवडणुका सुरु होताच वातावरण बदलत गेले आहे. पारनेर मतदारसंघातून राणी लंके आणि शिर्डी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रभावती घोगरे या महिलांनी उमेदवारी केल्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत चुरस निर्माण झाली. पहिल्यांदाच राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले. या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा झाल्यामुळे शिर्डीची निवडणूक चुरणीची झाली आहे. या निवडणुकीत विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

संगमनेरमध्ये देखील बाळासाहेब थोरात यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात आले आहे. विखे आणि थोरात या दोन्ही नेत्यांनी यंदा एकमेकांच्या मतदारसंघांत उमेदवार उभे करुन अप्रत्यक्ष एकमेकांनाच आव्हान दिले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. शेवगाव, कर्जत व नेवासा या तीनही मतदारसंघांतील लढती चुरशीच्या झाल्या आहेत. या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे सांगणे देखील अवघड आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणते बारा चेहरे विधानसभेत पोहोचणार याचा निर्णय शनिवारी होणार आहे. त्यामुळे निकालाकडे जनतेचे लक्ष लागले असले तरी लोकांच्या चर्चेतून अकोल्यातून किरण लहामटे , संगमनेरमधून बाळासाहेब थोरात , शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील , कोपरगांवमधून आशुतोष काळे , राहुरीतून प्राजक्ता तनपूरे , श्रीरामपूरमधून हेंमत ओंगले , नेवासातून शंकरराव गडाख , पाथर्डीतून मानिका राजळे , नगरशहरमधून संग्राम जगताप , पारनेरमधून राणी लंके , श्रीगोंदातून विक्रम पाचपूते तर कर्जत जामखेडमधून प्रा राम शिंदे हे विजयी होतील .
.

