रायतेवाडी सावरगाव तळ मध्ये ग्रामसभेतून निषेध
शनिवारी विविध गावांमध्ये ग्रामसभा होणार
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी राजकीय उद्देशातून आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करून त्यामध्ये संगमनेर शहरालगतची अनेक गावे जोडण्याचा सत्ताधाऱ्यांनी घातलेला घाट उलथून टाकण्यासाठी गावागावांमधून निषेध होत असून रायतेवाडी व सावरगाव तळ येथून निषेध नोंदवत गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असूनही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सततच्या विकास कामांमुळे हा तालुका राज्यात प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. येथील सहकार , शिक्षण,ग्रामीण विकास, अर्थव्यवस्था ही काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी संगमनेर तालुक्याला मोडण्याचा प्रयत्न चालवला आहे.

प्रशासनाच्या सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड सुरू असून शहरालगची अनेक गावे आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयात जोडली आहे. ही वार्ता कळतात संगमनेर तालुक्यात मोठी संतापाची लाट उसळली.

अनेक गावांमधील शिष्टमंडळाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही असा इशारा प्रशासनाला दिला.

यानंतर गावागावांमधून तरुणांनी याबाबत मोठी जनजागृती केली असून सर्व गावांमधून ग्रामसभा घेऊन या निर्णयाविरुद्ध ठराव मांडला जाणार आहे. यासाठी सावरगाव तळ येथे मोठी ग्रामसभा होऊन या निर्णयाला ठाम विरोध करण्यात आला तर रायतेवाडी येथेही ग्रामस्थांनी एकत्र येत या नवीन निर्णयाचा तीव्र विरोध केला.

हा निर्णय रद्द न केल्यास संपूर्ण गाव उपोषण करेल असा इशाराही रायतेवाडी ग्रामस्थांनी दिला असल्याची माहिती दूध संघाचे संचालक संतोष मांडेकर यांनी दिली आहे.

उद्या शनिवार एक फेब्रुवारी रोजी विविध गावांमधून ग्रामसभा घेऊन या निर्णयाचा कडाडून विरोध होणार आहे

