पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न
जिल्ह्याच्या ९१२ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता
अहिल्यानगर । झुंजार न्यूज
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २०२५-२६ या वर्षासाठी ९१२ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
यामध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना – ७०२ कोटी ८९ लक्ष, अनुसूचित जाती उपयोजना – १४४ कोटी, आणि आदिवासी उपयोजना – ६५ कोटी ८९ लक्ष रुपयांचा समावेश आहे.
बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी मान्यवर उपस्थित होते.
१७५ कोटी ७२ लक्ष जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव
प्रस्तावित आराखड्यातील १७५ कोटी ७२ लक्ष २५ हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. वित्त व नियोजन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत हा आराखडा सादर केला जाणार आहे. याशिवाय, १५० कोटी अतिरिक्त निधीसाठी मागणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
विभागवार निधी वाटप
ग्रामीण विकास – ३५ कोटी
ऊर्जा विकास – ५० कोटी
कृषी व संलग्न सेवा – ९९ कोटी २८ लक्ष ८४ हजार
पाटबंधारे व पूर नियंत्रण – ३१ कोटी ८४ लक्ष ३६ हजार
उद्योग व खाण – ४ कोटी ३० लक्ष
परिवहन – १०९ कोटी
सामान्य आर्थिक सेवा – ८९ कोटी २८ लक्ष ६७ हजार
सामाजिक सेवा – २१३ कोटी ८७ लक्ष ६८ हजार
सामान्य सेवा – १९ कोटी १५ लक्ष
इतर जिल्हा योजना – १६ कोटी
नाविन्यपूर्ण योजना – ३५ कोटी १४ लक्ष ४५ हजार
१४ तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
या बैठकीत १३ ग्रामीण आणि १ नागरी तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. यामध्ये श्री दत्त महाराज देवस्थान (निळवंडे, संगमनेर), श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान (पुणेवाडी, पारनेर), श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर (गळनिंब, श्रीरामपूर), श्री सद्गुरू धर्मराज देव मंदिर (तांदळी वडगाव, नगर) आदींचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्ण विकासकामांवर भर द्या – पालकमंत्री
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक असावीत, तसेच १०० दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत विभागांनी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश दिले.
वन विभागाने बिबट्या-संभाव्य क्षेत्रांमध्ये संरक्षणासाठी विशेष योजना प्रस्तावित करावी.
शाळांसाठी वर्गखोल्या मंजूर करण्याबरोबरच स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल करण्यावर भर द्यावा.
बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी समिती स्थापन केली जाईल.
शासकीय कार्यालयांमध्ये शून्य प्रलंबित कामे ठेवण्यासाठी ई-कार्यालय प्रणाली राबवावी.
सौर कृषी पंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून अवैध पैसे मागितले जात असल्यास संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विशेष विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. यामध्ये –
३०० अंगणवाड्यांचे बांधकाम
३०० जलस्रोतातील गाळ काढणे
३०० गावे अतिक्रमणमुक्त करणे
पुरातन बारवांची दुरुस्ती
कन्या विद्यालयात सीसीटीव्ही बसवणे
तसेच, नेवासे येथे संत ज्ञानेश्वर सृष्टीसाठी आराखडा तयार करून शासनास सादर केला जाणार आहे.
विविध विषयांवर चर्चा
बैठकीत कालव्यांची दुरुस्ती, विजेच्या अपुऱ्या पुरवठ्याचा प्रश्न, रेल्वे हद्दीतील अतिक्रमण, अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालणे, नगरपालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे यांसारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
