मेंढवन येथे लष्करी इतमामात बुधवारी अंत्यसंस्कार झाले
संगमनेर । झुंजार न्यूज
भारतीय लष्करात हवालदार पदावर असलेल्या रामदास साहेबराव बढे या जवानाला काल काश्मीर खोऱ्यात वीरमरण प्राप्त झाले आहे. सोमवारी काश्मीर खोऱ्यातील तंगधार क्षेत्रात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय जवानांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या गोळीबारात जखमी झाल्याने रामदास बढे यांना वीरमरण प्राप्त झाले. बुधवारी लष्करी इतमामात त्यांच्यावर मेंढवन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
पाकिस्तान सैनिकांकडून भारतीय सैन्यावर गोळीबार सुरू असताना भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांकडून पाकिस्तानी रेंजर्सच्या कृत्याला सडेतोड उत्तर दिले जात आहे. काश्मीर खोऱ्यातील तंगधार क्षेत्रात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय जवानांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात जखमी झाल्याने बढे या जवानाला वीरमरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव काश्मीर खोऱ्यातून मुंबईला विमानाने पाठवण्यात आले होते . बुधवारी मेंढवण या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले .
मंगळवारी लष्कराने त्यांच्या पार्थिवाला मानवंदना दिल्यानंतर विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला पाठवण्यात आले होते . तेथून ते संगमनेरकडे पाठवण्यात आले . बुधवारी सकाळी मेंढवण गावी लष्कराच्या वतीने अखेरची मानवंदना दिल्यानंतर संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे आपल्या पथकासह मेंढवणमध्ये काल दाखल झाले. लष्करी अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली होती. शहीद रामदास बढे यांच्या पश्चात वृद्ध वीरमाता, पत्नी, मुलगी, दोन मुलगे व लहान भाऊ, असा परिवार आहे.
