संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातून एक थरारक घटना घडली सोमेश्वर माध्यमिक विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. प्रगती सखाराम श्रीराम हिच्यावर सकाळी शाळेत जात असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. सुदैवाने, देवराम तुळाजी खेमनर यांच्या प्रसंगावधानामुळे प्रगतीचे प्राण वाचले, तर वनविभागाने तातडीने कार्यवाही करत बिबट्याला ८ तासात जेरबंद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, कु. प्रगती श्रीराम सकाळी 7.15 वाजता शाळेकडे पायी जात होती. सरपंच अशोक खेमनर यांच्या वस्तीजवळील एका कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात बिबट्याने प्रगतीच्या मानेवर जखमा केल्या. त्याचवेळी, तेथून जाणाऱ्या देवराम तुळाजी खेमनर यांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ धाव घेऊन बिबट्याला पळवून लावले, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
हल्ल्यामुळे झालेल्या आरडाओरड्यामुळे सरपंच अशोक खेमनर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोणतीही वेळ न घालवता जखमी प्रगतीला तातडीने संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, शेख, विस्ताराधिकारी गुंडे, हिरगळ आणि केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव , सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सचिव जानकीराम पुणेकर यांनी रुग्णालयात जावून प्रगतीच्या तब्येतीची चौकशी केली.
सरपंच अशोक खेमनर यांनी तात्काळ जनसेवा कार्यालयाचे सहायक श्रीरसागर आणि वनाधिकारी यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाने कोणतीही दिरंगाई न करता कार्यवाही सुरू केली. एसीएफ अमरजीत पवार यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू पथकातील रवींद्र पडवाल, वनाधिकारी सुभाष सांगळे, वनपाल सुजित बोकडे, सुभाष धानापुणे, रामेश्वर मंडपे आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि वनविभागाच्या अथक प्रयत्नांमुळे, हल्लेखोर बिबट्याला अवघ्या ८ तासांत जेरबंद करण्यात यश आले. या यशस्वी ऑपरेशनमुळे डिग्रस परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे निर्माण झालेल्या धोक्याची आणि वनविभागाच्या सतर्कतेची गरज अधोरेखित झाली आहे.