संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीने आता राजकीय आखाड्यात चांगलीच रंगत आणली आहे. या निवडणुकीत महायुतीविरोधात राजकीय दोन हात करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी ‘संगमनेर सेवा समिती’ या पॅनलखाली समविचारी लोकांना एकत्र आणले आहे. यामुळे नगराध्यक्षपदाच्या सत्तासंघर्षात आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ या दोन आमदारांची ताकद पणाला लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा काँग्रेसने कोणत्याही उमेदवाराला अधिकृत उमेदवारी न दिल्याने पहिल्यांदाच मतपत्रिकेवर ‘पंजा’ चिन्ह दिसणार नाही.

 

 

नगराध्यक्षपदासाठी कौटुंबिक संघर्ष

या निवडणुकीत आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे हे प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. संगमनेर सेवा समितीने नगराध्यक्षपदासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महायुतीकडून शिवसेनेच्या नगराध्यक्षपदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा संदीप खताळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता आता संपुष्टात आली आहे.

थोरात यांची सूत्रे तांबे यांच्या हाती

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरातील नगरपालिका निवडणुकीत फारसे लक्ष न घालता, आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे सूत्रे सोपवली आहेत. यामुळे आमदार तांबे यांनी सुरुवातीपासूनच शहरात संपर्क वाढवून संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली. त्यांनी इच्छुकांशी संपर्क साधून चर्चा केली, मात्र ‘नवे-जुने’ हा वाद उफाळून आला. आमदार थोरात यांना मानणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी केली होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देताना शाब्दिक वादही झाले. यातून मार्ग काढत असताना ‘शहर विकास आघाडी’ म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली होती. अखेर सोमवारी पालिका निवडणूक ‘संगमनेर सेवा समिती’च्या माध्यमातून लढवण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे काँग्रेसच्या गटात काहीशी नाराजी पसरली असून, पालिका निवडणुकीत यंदा प्रथमच ‘पंजा’ चिन्ह गायब झाले आहे.

 

थोरात यांची अनुपस्थिती आणि राजकीय चर्चा

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यात काँग्रेसचे वजनदार नेते असून, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांचे संगमनेरकडे लक्ष लागले होते. मात्र, स्वतः बाळासाहेब थोरात पालिका निवडणुकीत सक्रिय दिसले नाहीत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी बाळासाहेब थोरात संगमनेरात नव्हते, याबाबत दिवसभर चर्चा सुरू होती. स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा केली.

 

महायुतीची रणनीती आणि खताळ यांचा घराणेशाहीवर पलटवार

 

दुसरीकडे, आमदार अमोल खताळ यांनी महायुती अधिकृत पक्ष चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. सामूहिकपणे महायुतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आमदार खताळ यांनी शिवसेनेकडून अनेक उमेदवारांना संधी दिली आहे. पक्षाचे अधिकृत चिन्ह घेऊनच महायुतीचे उमेदवार जनतेसमोर जाणार असल्याचे आमदार खताळ यांनी जाहीर केले.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांच्यावर आमदार अमोल खताळ यांनी घराणेशाहीचा आरोप केला होता. मात्र, आता नगराध्यक्षपदाची उमेदवारी खताळ यांनी आपल्याच वहिनींना जाहीर केल्याने, ‘घराणेशाही’वर ते जनतेसमोर काय उत्तर घेऊन जाणार, याविषयी विरोधकांनी चर्चा सुरू केली आहे.

 

 

थोडक्यात, थोरात यांचे आशीर्वाद घेऊन आमदार तांबे रिंगणात उतरले आहेत, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही खताळांना ताकद देताना दिसत आहेत. मात्र, ही ताकद संगमनेर कारखाना निवडणुकीप्रमाणे ऐनवेळी डोक्यावरचा हात काढणारी असेल का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *