शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत अर्ज माघारीच्या दिवशी मोठे राजकीय नाट्य घडले असून, आता लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या राजकीय रणनीतीमुळे महायुतीला मोठे यश मिळाले असून, प्रभाग क्रमांक ८ (ब) मधून छाया पोपट शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, उर्वरित जागांवर आता महायुती, काँग्रेस , उबाठा आणि पुरोहित गटामध्ये जोरदार ‘ चौरंगी’ सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विखेंची खेळी यशस्वी: प्रभाग ८ मध्ये एकतर्फी विजय
काल, अर्ज माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक ८ (ब) मध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. या प्रभागात भाजपचे अधिकृत ‘ए बी’ फॉर्म प्राप्त असलेल्या व माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या पत्नी मनीषा शिवाजी गोंदकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्यासह अपक्ष उमेदवार आमिना दिलदार सय्यद, रश्मी रमेश कोते आणि गीता सोमनाथ कावळे यांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी या घडामोडींवर स्वतः लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली झालेल्या चर्चेनंतर विरोधी उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी इतर उमेदवारांचे अर्ज मागे घेतल्याची खातरजमा केल्यानंतर छाया पोपट शिंदे यांना बिनविरोध विजयी घोषित केले. या विजयानंतर शिंदे समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
‘विष पसरविणाऱ्यांना धडा शिकवला’ – डॉ. सुजय विखे पाटील
या विजयावर प्रतिक्रिया देताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “प्रभाग ८ मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार व जुने सहकारी यांनी अर्ज भरल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून हा पेच सोडवण्यात आला आहे. मी कोणावरही दबाव टाकलेला नाही, हा समन्वयातून निघालेला मार्ग आहे. पक्षात राहून विष पसरविणाऱ्यांना हा एक धडा आहे.
आता लढत ‘ चौरंगी’
एकीकडे बिनविरोध निवडीचा जल्लोष असला तरी, दुसरीकडे नगराध्यक्षपद आणि इतर प्रभागांमध्ये चुरस वाढली आहे. आता महायुती, काँग्रेस , उबाठा आणि पुरोहित गट यांच्यात थेट सामना होणार असल्याने शिर्डीचे राजकारण तापले आहे.
शिर्डी नगरपरिषद निवडणूक : अंतिम उमेदवारांची यादी निवडणूक रिंगणात उरलेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय यादी खालीलप्रमाणे आहे: