झरेकाठी । झुंझार न्यूज

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी झरेकाठी (ता. संगमनेर) येथे विविध शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सौ. धनश्री सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उपक्रम संपन्न होणार असून, जनसेवा फाउंडेशन लोणी आणि जनसेवा युवा मंच झरेकाठी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे.

 

शनिवारी सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झरेकाठी येथे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने ‘चला शिकूया – झटपट उजळणी’ या विशेष शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना कलमी आंबा रोपांचे वाटप करून ‘वृक्षारोपण व संवर्धन’ या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.


केवळ उत्सव न साजरा करता महिलांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी या कार्यक्रमात विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील महिला बचत गटांना कलमी आंबा रोपे देऊन त्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग दाखवण्यात येणार आहे. तसेच, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी बँक कर्ज, शासकीय योजना आणि आर्थिक नियोजनाची माहिती दिली जाणार आहे.


यासाठी अहिल्यानगरचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष नवले आणि आश्वी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर मनीषा नवले उपस्थित राहून महिलांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. कर्ज प्रकरणांमधील तांत्रिक अडचणी आणि बँकिंग व्यवहारातील सुलभता यावर यावेळी चर्चा केली जाईल.


वाढदिवसानिमित्त केवळ हार-तुरे किंवा फ्लेक्सबाजी न करता शिक्षण, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण या तीन महत्त्वाच्या पैलूंवर आधारित हे उपक्रम राबवले जात असल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. “विखे पाटील परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, त्याचाच प्रत्यय आज झरेकाठीत येत आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसेवा युवा मंच झरेकाठी, गावातील सेवा सोसायटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *