पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतला नियोजनाचा आढावा
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गती देण्यासाठी राज्याचे लोकप्रिय नेते आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज प्रत्यक्ष सभास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

अहिल्यानगर महानगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी या सभेचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या सभेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस प्रचाराचा नारळ फोडणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सभे कडे लागले आहे.
आज झालेल्या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मैदानाचा नकाशा, व्यासपीठाची रचना, उपस्थितांसाठी बसण्याची व्यवस्था आणि सुरक्षितता या बाबींची बारकाईने पाहणी केली. सभेला होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, कोठेही गोंधळ होऊ नये यासाठी त्यांनी संयोजकांना आणि उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
सभेच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आणि पार्किंगच्या व्यवस्थेबाबत विखे पाटील यांनी विशेष चर्चा केली. सभेच्या ठिकाणी येणारे रस्ते आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनालाही विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
अतिविशेष व्यक्तींच्या (VVIP) सुरक्षेच्या दृष्टीने सभेच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेचे व्यवस्थापन चोख असावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाचा आढावा घेतल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या सभेला अहिल्यानगर शहरातून आणि ग्रामीण भागातून विक्रमी जनसमुदाय उपस्थित राहील, असा विश्वास यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यावेळी भाजपचे स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फडणवीस यांच्या या तोफेमुळे अहिल्यानगरच्या निवडणुकीत नेमके कोणते नवे समीकरण उभे राहणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.
Post Views: 565



