पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे आता थेट खासदार निलेश लंके यांच्यापर्यंत पोहोचल्याच्या चर्चेने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे याचे खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्यासोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून, यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
गेल्या आठवड्यात शिरूर पोलिसांनी ड्रग्ज तस्करीप्रकरणी शादाब शेख या गॅरेजचालकाला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता, हे ड्रग्ज त्याला पारनेर तालुक्यातील कोहोकडी येथील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे याने पुरवल्याचे समोर आले. या तपासादरम्यान अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा (LCB) पोलीस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याचेही नाव समोर आल्याने खळबळ उडाली. गुजर याला पोलिसांनी आधीच अटक केली असून, आता माऊली शिंदे याचे नाव एफआयआरमध्ये आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
माऊली शिंदे हा खासदार निलेश लंके यांचा ‘कट्टर कार्यकर्ता’ असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये माऊली शिंदे याच्या मुलाच्या वाढदिवसाला खासदार लंके यांनी हजेरी लावल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच, शिंदे कुटुंबाचे राणी लंके यांच्यासोबतचे काही घरगुती फोटोही समोर आले आहेत. मुख्य आरोपीसोबत खासदारांचे इतके जवळचे संबंध असल्याने विरोधकांनी आता लंकेंना घेरण्यास सुरुवात केली आहे.
सुजय विखे पाटलांचे गंभीर आरोप
या प्रकरणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ड्रग्ज प्रकरणातील आरोपी श्यामसुंदर गुजर याच्यावर पारनेरमध्ये असताना अनेक गंभीर आरोप होते, तरीही त्याची बदली एलसीबीत कशी झाली? कोणाच्या शिफारशीवरून त्याला क्रीम पोस्टिंग देण्यात आली?” असा सवाल विखेंनी विचारला.
तसेच, माऊली शिंदेचे नाव एफआयआरमधून वगळण्यासाठी एक बडा नेता अर्धा तास पोलीस ठाण्यात बसून दबाव टाकत होता, असा खळबळजनक आरोपही विखे पाटलांनी केला आहे. तो नेता नेमका कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, खासदार निलेश लंके यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “पारनेर तालुक्याला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. सिस्पे-इन्फिनिटी प्रकरणातही माझे नाव जाणीवपूर्वक ओढले गेले,” असे त्यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, आता थेट ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबतचे कौटुंबिक फोटो समोर आल्याने लंके यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
खासदार निलेश लंके यांचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा सत्कार स्वीकारल्यावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. तसेच, शेकडो कोटींच्या सिस्पे घोटाळ्यातील संचालकांशी असलेले त्यांचे नातेसंबंधही चर्चेत राहिले होते. आता ड्रग्ज माफियाशी संबंध जोडले जात असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी लंकेंकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
ड्रग्जसारख्या गंभीर विषयात खासदारांच्या जवळच्या व्यक्तीचे नाव आल्याने पोलीस आता या प्रकरणाची व्याप्ती किती आहे आणि यात कोणाकोणाचे अभय लाभले आहे, याचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.