संगमनेर । झुंझार न्यूज
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा एकच आहे. दोन्ही पक्षांच्या विचारधारेमध्ये फरक नाही. ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार हे कधीही प्रतिगामी विचारधारा स्वीकारणार नाही. देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले असून ते वाचवण्यासाठी सर्व लोकशाही मानणाऱ्या समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे मत महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना काँग्रेसचे माजी प्रांताध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची विचारधारा एक आहे. लोकशाही ,राज्यघटना, संतांचा, बहुजनांचा आणि पुरोगामी विचार असलेली ही विचारधारा आहे. आमच्या विचारधारेमध्ये फरक नाही. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब कधीही प्रतिगामी विचारधारा स्वीकारणार नाही असे माझे मत आहे.
ही लढाई विचारधारेची आहे. सध्या देशांमध्ये लोकशाही, संविधान धोक्यात आले आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव आहे, पत्रकारितेमध्ये आपल्या देशाचा नंबर आता 157 वा आहे. निवडणूक आयोगाबद्दल काय बोलणार. अशी सगळी परिस्थिती असताना लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या सर्व पक्षांनी पहिला देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे.
प्रत्येक क्षेत्रामध्ये दोष असतात पण दोष किती असावे याचे प्रमाण असते. आता फक्त दोष शिल्लक राहतात की काय अशी अवस्था सध्या सरकार आणि राजकारणामध्ये आहे. जास्त दोषांमुळे चांगले शोधण्याची वेळ आली आहे. पूर्वी दोष शोधले जायचे आता चांगले शोधावे लागत आहे. याचबरोबर सध्याचे राजकारण हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले
अहिल्यानगर जिल्ह्यामधून संधी मिळालेल्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासाकरता जास्तीत जास्त निधी आणावा. याचबरोबर नाशिक पुणे रेल्वे जी थांबवली गेली आहे . ती सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

