राळेगण सिद्धी येथे नियुक्तीपत्र प्रदान
राळेगण सिद्धी । झुंझार न्यूज
निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले पर्यावरण प्रेमी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अनिल लोखंडे यांची ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य’ च्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती संध्याताई गायकवाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

आदर्श गाव राळेगण सिद्धी येथे जागतिक पर्यावरण दिन आणि स्व. वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती संध्याताई गायकवाड होत्या. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सरकारी वकील सुरेश लगड, छत्रपती संभाजीनगरचे सेवानिवृत्त वनाधिकारी प्रभाकर म्हस्के, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे, सचिव वनश्री मोरे, कार्याध्यक्षा श्रीमती छायाताई राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी डॉ. अनिल लोखंडे यांची सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी ‘उपाध्यक्ष’ म्हणून निवड केली आहे.

याच कार्यक्रमात डॉ. अनिल लोखंडे आणि त्यांच्या पत्नी सौ. आशाताई लोखंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नामांकित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध विद्यालयांमध्ये शिक्षक ते मुख्याध्यापक अशा विविध पदांवर डॉ. लोखंडे यांनी बजावलेली प्रामाणिक सेवा आणि विद्यार्थी हिताच्या कार्याबद्दल, पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या शुभहस्ते त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. अनिल लोखंडे हे गेल्या १५ वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन आणि सामाजिक जाणीव जागृतीच्या कामात सक्रिय आहेत. शिर्डी, राळेगण सिद्धी, चिपळूण, पुणे, नांदेड आणि अकोले अशा विविध ठिकाणी झालेली पर्यावरण संमेलने व कार्यशाळांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. त्यांनी भूतान देशाचा पर्यावरण अभ्यास दौराही केला आहे. विशेषतः उन्हाळ्यात मुक्या पशू-पक्ष्यांसाठी ‘मूठभर चारा आणि घोटभर पाणी’ ही संकल्पना त्यांनी प्रभावीपणे राबवून भूतदयेचा संदेश दिला आहे. मानवी जीवनात वृक्षांचे महत्त्व आणि पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत ते सातत्याने प्रबोधन करत असतात.

