निवडणूक रणधुमाळीला वेग, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
झरेकाठी । झुंझार न्यूज
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील झरेकाठी ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप आराखडा अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या या नवीन आरक्षणामुळे गावातील राजकीय गणिते बदलली असून, इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
झरेकाठी ग्रामपंचायतीची एकूण सदस्यसंख्या ९ असून, त्यांची विभागणी तीन प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातून तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या स्वाक्षरीने हा आदेश अहिल्यानगर येथून जारी करण्यात आला आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, तीनही प्रभागांतील आरक्षणाची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
प्रभाग क्रमांक १: या प्रभागात एकूण तीन जागा असून, त्यापैकी एक जागा अनुसूचित जाती (महिला), एक जागा अनुसूचित जमाती (महिला) आणि एक जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक २: या प्रभागामध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.), एक जागा सर्वसाधारण महिला आणि एक जागा सर्वसाधारण गटासाठी निश्चित करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ३: या प्रभागात एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र. – महिला), एक जागा सर्वसाधारण महिला आणि एक जागा सर्वसाधारण गटासाठी ठेवण्यात आली आहे.

आरक्षणाचे प्रारूप जाहीर होताच झरेकाठी गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक प्रस्थापित नेत्यांच्या प्रभागातील समीकरणे बदलल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः महिला आरक्ष मुळे गावातील महिला उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरून इच्छुकांनी आपले फोटो आणि शुभेच्छापत्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप आरक्षणावर नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना आपल्या सूचना किंवा हरकती नोंदवता येणार आहेत. या हरकतींचा विचार करून अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हा आराखडा प्रसिद्ध करतेवेळी शिबालपुर महसूल मंडळाचे मंडलाधिकारी पठाण, ग्राम महसूल अधिकारी ए. एस. गांगुर्डे यांच्यासह झरेकाठी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, मात्र आता सर्वांचे लक्ष अंतिम आरक्षणाकडे लागले आहे.
