आश्वी । झुंझार न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून ‘विखे घराणे विरुद्ध इतर’ असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. मात्र, २०१९ मध्ये राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे. विखे पाटील यांनी केवळ आपला बालेकिल्ला राखला नाही, तर संपूर्ण जिल्हा ‘भाजपमय’ करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील या पिता-पुत्रांच्या जोडीचा मोठा वाटा असून, पक्ष आता जिल्ह्यात ‘शत-प्रतिशत’ यश मिळवण्याच्या मार्गावर आहे.

नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विखे पाटील यांची रणनीती अत्यंत प्रभावी ठरली. विरोधकांच्या चक्रव्यूहात न अडकता आपल्या उमेदवारांना कशा प्रकारे बळ द्यायचे, यात विखे पाटील यांचा हातखंडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विखे पाटील यांनी जिल्ह्याची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली आहेत. कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, या विखे पॅटर्नमुळेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात भाजपची पाळेमुळे घट्ट झाली आहेत.

आजमितीस अहिल्यानगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यात एकूण १९ आमदार (१२ विधानसभा आणि ७ विधान परिषद) असून, त्यापैकी सर्वाधिक ९ आमदार एकट्या भाजपचे आहेत. ही आकडेवारी विखे पाटील यांच्या संघटन कौशल्याची मोठी साक्ष देते. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान राखत आणि नव्या दमाच्या तरुणांना संधी देत त्यांनी जिल्ह्याची मोट बांधली आहे. यामुळेच आज जिल्ह्यात भाजपमध्ये ‘विखे’ हाच शब्द प्रमाण मानला जात आहे.

केवळ विधानसभा किंवा लोकसभेपर्यंत विखे पिता-पुत्रांची घोडदौड मर्यादित राहिलेली नाही. नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीतही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि नगरपंचायतींवर आज भाजपचा भगवा फडकत आहे. अहमदनगर महापालिकेतही भाजपने २५ जागा जिंकून आपली दमदार उपस्थिती दर्शवली आहे. संगमनेर असो वा पारनेर, नेवासा असो वा राहुरी, प्रत्येक मतदारसंघात विखेंच्या रणनीतीचा प्रभाव जाणवत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे ट्युनिंग जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भाजपच्या विस्तारासाठी पूरक ठरले आहे. केंद्रातील मोदी सरकारची विकासकामे आणि राज्यातील महायुती सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात विखे पिता-पुत्र आघाडीवर आहेत. जिल्ह्यातील दोन-तीन तालुके वगळता उर्वरित सर्व भागात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. ‘शत-प्रतिशत भाजप’ हे स्वप्न आता केवळ घोषणा नसून ती अहिल्यानगरमधील वस्तुस्थिती बनत चालली आहे.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेच्या रिंगणात विखे पिता-पुत्रांचा हा ‘राजकीय धडाका’ विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार, यात शंका नाही.
कोपरगावपासून कर्जत-जामखेडपर्यंत ‘विखे नेटवर्क’
पद्मविभूषण स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी जिल्ह्यात सहकारी संस्था आणि कार्यकर्त्यांचे जे जाळे निर्माण केले होते, त्याला आधुनिक राजकारणाची जोड राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. कोपरगाव, अकोले या उत्तर भागापासून ते थेट कर्जत-जामखेड या दक्षिण टोकापर्यंत विखेंच्या कार्यकर्त्यांची फळी सक्रिय आहे. विशेषतः दक्षिण भागात आजोबा (बाळासाहेब विखे पाटील) आणि नातू (डॉ. सुजय विखे पाटील) यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा भाजपसाठी मोठा फायदा ठरत आहे.
Post Views: 6



