मराठा आरक्षण, औद्योगिक विकास आणि जलयात्रेमुळे विकासाचा वेग वाढला; उपनगराध्यक्षांनी मांडला प्रगतीचा पाढा

 

शिर्डी । झुंझार न्यूज

 


राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये आणि सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने शिर्डी विधानसभा मतदारसंघाला राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा औद्योगिक विकासाची झेप, विखे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे शिर्डीचा कायापालट होत असल्याचे प्रतिपादन शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी केले.

पत्रकारांशी संवाद साधताना अभय शेळके यांनी विखे पाटील यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, गेल्या काही काळापासून राज्यातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक घडामोडींमध्ये शिर्डी मतदारसंघाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. याचे मुख्य श्रेय ना. विखे पाटील यांच्या धोरणी नेतृत्वाला जाते.


मराठा आरक्षणाच्या संवेदनशील मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शैक्षणिक सुविधा आणि सवलती लागू करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला, त्या प्रक्रियेत विखे पाटील यांचा सहभाग मोलाचा ठरला. 

राजकीय आघाडीवरही विखे पाटील यांनी आपली पकड घट्ट केली आहे. राहुरी विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी अत्यंत प्रभावी समन्वय साधला. त्यांच्या नियोजनामुळेच राहुरी मतदारसंघातून भाजपचे दोन आमदार (आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार अक्षय कर्डिले) निवडून येण्यास मदत झाली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवल्याचे शेळके यांनी नमूद केले.


शिर्डीच्या विकासात औद्योगिक वसाहतीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. शेती महामंडळाची ५०० एकर जमीन हस्तांतरित करून विखे पाटील यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केला. या ठिकाणी देशातील खासगी क्षेत्रातील पहिला ‘तोफगोळे निर्मिती प्रकल्प’ साकारला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाल्याने शिर्डीचे नाव राष्ट्रीय नकाशावर झळकले आहे.

याशिवाय, टाटा उद्योगसमूहाच्या माध्यमातून येथे कौशल्य विकास केंद्र उभारले जात आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. आगामी काळात या औद्योगिक वसाहतीतून सुमारे १० हजार तरुणांना थेट रोजगार मिळेल, असा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला.


केवळ उद्योगच नव्हे तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणाची कामे त्यांनी मार्गी लावली. पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा’ या महत्त्वाकांक्षी जलयात्रेच्या माध्यमातून त्यांनी या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

 

 


जलसंपदा विभाग झाला लोकाभिमुख

 

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केवळ पदे भूषवली नाहीत, तर त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले. जलसंपदा विभागाला लोकाभिमुख करण्याचे काम त्यांनी केले. ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा यशस्वी करून त्यांनी कोरड्या भागाला संजीवनी देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या विकासकामांच्या धडाक्यामुळे शिर्डी मतदारसंघ विकासाचे रोल मॉडेल ठरत आहे


– अभय शेळके (उपनगराध्यक्ष, शिर्डी)


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *