पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना 3 लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

महाराष्ट्र सरकार शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना सातत्याने पाठबळ देत असून शासनाने पशुपालकांसाठी महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराने 3 लाखांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध होणार असून यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. या शेतकर्‍यांच्या व्यावसाय वाढीसाठी तसेच पशुधनाच्या देखभाल व दैनंदिन खर्चासाठी भांडवल उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पशुपालकांची हीच गरज ओळखून शासनाकडून ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजना ठोसपणे राबविण्यात येणार असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.

आमदार अमोल खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सविस्तरपणे नमूद केले आहे की; पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून व्याज सवलतीसह अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १.६० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध करून दिले जाईल. दूध संस्थेच्या हमीवर ही मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. तसेच, ज्यांच्याकडे आधीच किसान क्रेडीट कार्ड आहे, त्यांनाही ३ लाखांपर्यंतची पतमर्यादा वाढवून घेता येईल.

कर्जाचा मूळ व्याजदर ९% असला तरी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ३% आणि राज्य शासनाकडून ४% अशी एकूण ७% पर्यंत व्याज सवलत मिळणार आहे. बँकांनाही यात २% व्याज सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालक किंवा शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेता येणार आहे.

जे पशुपालक दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद आहेत व ज्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही, असे सर्व शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत. याशिवाय अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना अथवा १९६२ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असेही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

——————–

 

पशुपालक आणि दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या व्यवसायाला आर्थिक बळ मिळावे, पशुधनाच्या संगोपनासाठी आवश्यक भांडवल सहज उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांना सावकारीपासून दिलासा मिळावा, यासाठी शासनाने ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ ही अत्यंत उपयुक्त योजना सुरू केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार असल्याने या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.”

 

– आमदार अमोल खताळ
(संगमनेर विधानसभा)

—————————

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *