राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या ‘जनता दरबारा’च्या माध्यमातून प्रशासनाला कामाला लावले आहे. प्रवरानगर येथे पार पडलेल्या या दरबारात विखे पाटलांनी केवळ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या नाहीत, तर वीज, पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच आदेश देऊन तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.
लोकाभिमुख प्रशासनाचा वस्तुपाठ घालून देत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दरमहाप्रमाणे या महिन्यातही जनता दरबाराचे आयोजन केले होते. रविवारी लोणी येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात जिल्ह्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत गरजांपासून ते वैयक्तिक अडचणींपर्यंत शेकडो निवेदने मंत्र्यांकडे सादर करण्यात आली.
यावेळी मंत्री महोदयांनी केवळ अर्ज स्वीकारले नाहीत, तर प्रत्येक अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना समोर बोलावून घेतले. वीज वितरण कंपनीच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर कडक शब्दांत निर्देश देताना नामदार विखे पाटील म्हणाले की, वीज प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका आणि नागरिकांना दिलासा द्या. येत्या आठवडाभरात केलेल्या कारवाईचा अहवाल माझ्या कार्यालयाला सादर झालाच पाहिजे, असा सज्जड दमही त्यांनी यावेळी दिला.
वाढती उन्हाची तीव्रता पाहता, ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे, तिथे कोणतीही दिरंगाई न करता संवेदनशीलतेने टँकर सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आपण लवकरच आढावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बेरोजगार तरुणांसाठीही हा जनता दरबार आशेचा किरण ठरला. नोकरीसाठी आलेल्या अर्जांवर धोरणात्मक निर्णय घेतानाच, औद्योगिक क्षेत्राला लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन विखे पाटलांनी केले. उद्योजकांच्या मागणीनुसार पात्र उमेदवारांच्या शिफारशी केल्या जातील, असेही त्यांनी आश्वासित केले.
या जनता दरबारात काही विशेष निवेदने लक्षवेधी ठरली
१. स्थानिक विकास निधीतून सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यासाठी झरेकाठीतील ‘जनसेवा युवा मंचा’च्या वतीने निवेदन देण्यात आले.
२. संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील आदिवासी महिलांनी कविताताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात दारूबंदी करण्याची मागणी करत मंत्र्यांकडे दाद मागितली.
३. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
या जनता दरबाराला श्रीरामपूर, राहाता, संगमनेरसह जिल्ह्यातील सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लोकांच्या समस्या त्यांच्या उंबरठ्यावर जाऊन सोडवण्याच्या विखे पाटलांच्या या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.