टोल नाका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट कामामुळे वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत. महामार्गाचे काम, सर्व्हिस रोड, बोगद्यांतील सुरक्षा उपाययोजना, स्ट्रीट लाईटची कामे पूर्ण करावे तसेच ज्या लोकांचे टोल पास असून देखील त्यांच्याकडून टोल वसुली करण्यात येत आहे. ही टोल वसुली तात्काळ बंद करावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार २० जुलै रोजी टोलनाका कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रवीण कानवडे व विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष गजानन भोसले यांनी आमरण उपोषण आंदोलन केले आहे. यावेळी टोल नाका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असले, तरी संगमनेर तालुक्यात बोटा ते कऱ्हे घाट पट्ट्यात वाहनधारकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागतो. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे कंत्राटदारावर बंधनकारक आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक, चेतावणी फलक, रिफ्लेक्टर्स, ब्लिंकर्स आणि बॅरिकेडिंगचा अभाव असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. कन्हे घाट परिसरात स्ट्रीट लाईट नसल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे. बोगद्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असून, तेथे पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे रस्त्यावर तडे गेले असून ठिकठिकाणी निर्माण झालेले चढ-उतार अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा दावा केला आहे. स्टेटस हॉटेलजवळील पूल आणि रायतेवाडी फाटा येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू असून पर्यायी मार्ग नसल्याने वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांचा वेळ आणि इंधन वाया जातो. गेल्या काही महिन्यांत या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांत ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. शेकडो जखमी वा कायमस्वरूपी अपंग झाले. हे अपघात चालकांच्या निष्काळजीपणामुळे नसून, कंत्राटदार कंपनीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याने झाल्याचा आरोप करीत संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अपंग झालेल्या नागरिकांच्या उपचाराचा खर्च कंत्राटदाराकडून वसूल करावा, संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करून तिला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, तसेच महामार्गाच्या कामाचे आयआयटी किंवा तत्सम स्वायत्त संस्थेमार्फत ‘थर्ड पार्टी क्वालिटी अँड सेफ्टी ऑडिट’ करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पुढील २४ तासांत सर्व आवश्यक सुरक्षा फलक, रिफ्लेक्टर्स, ब्लिंकर्स आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला द्यावेत, तसेच संगमनेर तालुक्यातील अनेकांचे टोल पास काढण्यात आले आहेत. तरी सुद्धा टोल नाका चालकांकडून टोल पास धारकांना टोल कट झाल्याचे मेसेज येत आहेत. हे त्वरित बंद करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

अशा विविध मागण्यांसाठी आज सोमवार २० जुलैपासून हिवरगाव पावसा येथील टोलनाका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्षकपिल पवार, शहराध्यक्ष प्रवीण कानवडे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली राऊत, गजानन भोसले, संतोष भुजबळ,दिनेश डफेदार,अशोक काळे,भाऊ गोरे,गौरव वाळे,भाऊ म्हस्के, अमोल मस्के, सरलाताई भुजबळ, रईस पठाण, नितीन अहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *