प्रवरानगर येथे ‘महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

आश्वी । झुंझार न्यूज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. प्रलंबित सिंचन प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देतानाच, सरकारने शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे,” असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रवरानगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, केवळ कर्जमाफीच नव्हे तर कृषी पंपांच्या थकीत वीजबिलांची माफी देऊन सरकारने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी केला आहे. गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा वापर, निळवंडे कालव्याची कामे आणि विविध उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे. कृषी विभागाचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी कृषी सहाय्यकांना संगणक संचही उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना त्यांनी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जलसंपदा क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. निळवंडे धरण प्रकल्पग्रस्तांना जमिनीऐवजी आर्थिक मोबदला देण्याच्या त्यांच्या ऐतिहासिक निर्णयामुळेच पुनर्वसन प्रक्रिया जलद झाली आणि प्रकल्प मार्गी लागला, असे विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

प्रशासकीय गतिमानता आणि महिला सक्षमीकरण

अहिल्यानगर जिल्हा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत राज्यात अग्रस्थानी असल्याचे सांगत, कौशल्य विकास आणि एकल महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली. गावांचा विकास करताना पाणंद रस्ते आणि अतिक्रमणे हटवून दळणवळण सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले की, हे अभियान केवळ एका ठिकाणापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविले जाईल. ‘स्वामित्व’ योजना, आयुष्मान भारत आणि वयोवंदना योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रास्ताविकात शिर्डी विमानतळ, औद्योगिक वसाहत आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय यांमुळे होत असलेल्या परिसराच्या विकासाचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाला माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील , जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, राहाता नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, तहसीलदार अमोल मोरे , धीरज मांजरे , डॉ अशोक इथापे , गोकूळ दिघे , सचिन गाडे , सतिष जोशी , सुनिल जोशी याच्यासह महसूल, कृषी आणि आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी, विविध विभागांच्या योजनांतर्गत निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे आणि साहित्याचे वाटप करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *