साई निर्माण ग्रुपची नेपाळ तीर्थयात्रा संपन्न; १५०० भाविकांचा भक्ती अन् निसर्गाचा अविस्मरणीय प्रवास
आश्वी । झुंझार न्यूज
“काय ते डोंगर, काय त्या दऱ्या, काय तो निसर्ग…!” नेपाळच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमधून प्रवास करताना शिर्डीसह अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, संगमनेर, कोपरगाव, सिन्नर, श्रीरामपूर आणि राहुरी परिसरातील भाविकांच्या तोंडून हेच उद्गार ऐकायला मिळाले. साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ९ दिवसांची शिर्डी-नेपाळ ‘संकल्प तीर्थयात्रा’ उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. तब्बल १५०० भाविकांनी या यात्रेत सहभागी होत काशी विश्वेश्वर, अयोध्येतील प्रभू श्रीराम, नेपाळमधील पशुपतीनाथ आणि मनकामना देवीचे दर्शन घेतले.

श्रद्धा, भक्ती आणि निसर्गाचा अनोखा संगम ठरलेल्या या यात्रेचा परतीचा प्रवास शनिवारी नेपाळ सीमेवरील नैतनवा रेल्वे स्थानकावरून सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून नेपाळच्या कुशीत आध्यात्मिकता आणि निसर्गाचा अनुभव घेतलेले भाविक आता अविस्मरणीय आठवणी घेऊन मायदेशी परतू लागले.

या यात्रेदरम्यान भाविकांना केवळ नेपाळमधील देवस्थानांचे दर्शन घडले नाही, तर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांचाही अनुभव घेता आला. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन, काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद घेतल्यानंतर भाविकांनी नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतीनाथ आणि मनकामना देवीच्या चरणी माथा टेकवला.
💥 Zunjhar NewS 💥
**************************
👇
9657631563
यात्रेतील नेपाळचा निसर्गरम्य प्रवास भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. सुमारे ३० किलोमीटरचा रेल्वे प्रवास आणि अवघ्या काही मिनिटांचा चित्तथरारक अनुभव घेताना उंच पर्वतरांगा, खोल दऱ्या, खळाळणाऱ्या नद्या आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहून भाविक भारावून गेले. अनेकांनी हा निसर्ग आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
“आम्हाला हे दर्शन आणि असा प्रवास अनुभवता येईल, असे वाटले नव्हते. विजय कोतेमुळे हे शक्य झाले. काय तो निसर्ग आणि काय ती पर्वतराजी! पशुपतीनाथाच्या चरणी माथा टेकवल्यानंतर खरोखर आयुष्य सार्थकी लागल्याची भावना झाली,” अशी प्रतिक्रिया काही भाविकांनी व्यक्त केली. .
तब्बल १५०० भाविकांचा नऊ दिवसांचा प्रवास सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे पार पाडणे हे मोठे आव्हान होते. मात्र, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष तथा यात्रा कमिटी प्रमुख विजयराव कोते यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांच्या सहकार्याने प्रवास, निवास, भोजन आणि आरोग्य व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले.
मोठ्या संख्येने भाविक सहभागी असूनही यात्रेदरम्यान कुठेही गोंधळ होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. भाविकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात आल्याने संपूर्ण प्रवास सुखकर झाल्याचे सहभागी भाविकांनी सांगितले.
यात्रेच्या परतीच्या प्रवासात विजयराव कोते यांनी स्वतः रेल्वेच्या प्रत्येक डब्यात जाऊन भाविकांची विचारपूस केली. “तुम्ही जेवलात का?”, “तब्येत बरी आहे का?”, “प्रवास कसा झाला?”, अशा आपुलकीच्या शब्दांत त्यांनी भाविकांशी संवाद साधला. आयोजकांची ही आपुलकी पाहून अनेक भाविक भावूक झाले.
या यात्रेचे नियोजन आणि प्रवासातील अनुभव सांगताना विजयराव कोते यांनाही भावना अनावर झाल्या. १५०० भाविकांनी सुखरूप प्रवास पूर्ण केला आणि सर्वांना देवदर्शन व्यवस्थित घडले, याचा आनंद व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. हे अश्रू केवळ यात्रेच्या यशाचे नव्हते, तर भाविकांप्रती असलेल्या सेवाभावाचे आणि त्यांच्या प्रेमाचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शिर्डीसह विविध जिल्ह्यांतील भाविकांनी या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. साईबाबांचा आशीर्वाद, भाविकांची श्रद्धा आणि आयोजकांचे नियोजन यामुळे ही संकल्प तीर्थयात्रा यशस्वी झाल्याची भावना सहभागी भाविकांनी व्यक्त केली.
