विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण ही हुकूमशाही–माजी मंत्री बाळासाहेब थोरात
युवकांनी पुन्हा एकदा संघर्षासाठी उभे रहा
संगमनेर । झुंझार न्यूज
दिल्ली येथे विद्यार्थ्यांना झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हजारो संगमनेरकर आज रस्त्यावर उतरले. या घटनेचा तीव्र निषेध करत पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षण मंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करताना हजारो युवक विद्यार्थी महिला व नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संगमनेर दणाणून सोडले. याचवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हणजे हुकूमशाही असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली देश वाचवण्यासाठी तरुणांनी पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन त्यांनी केले आहे.
संगमनेर शहरात समविचारी पक्षांच्या वतीने विराट मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला. संगमनेर बस स्थानक ते महात्मा फुले स्मारक इथपर्यंत झालेल्या या रस्त्यामध्ये शहरातील व तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, वंचित बहुजन आघाडीचे आजीज ओरा, शिवसेनेचे अमोल बोराडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे कार्याध्यक्ष ॲड अमोल शेरकर, ॲड रंजना गवांदे, निखिल पापडेजा ,शेखर सोसे, रामहरी कातोरे ,पांडुरंग घुले, डॉ दानिश, नूर मोहम्मद शेख, अनुराधा आहेर, तुषार पानसरे, समीर लामखडे, अरबाज शेख, भगवान अहिरे, संदीप काकड, दत्ता ढगे,छात्र भारतीचे विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर बस स्थानक येथे संगमनेरातील हजारो कार्यकर्ते एकत्र आले. तेथून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून चावडी मार्गे हा मशाल मोर्चा महात्मा फुले पुतळा येथे आला.
यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनम वांगचुक ही देशातील आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांचे 21 दिवसापासून जंतर-मंतरवर उपोषण सुरू आहे. त्यांचा आवाज हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा आवाज आहे. परंतु केंद्र सरकारला तो ऐकू येत नाही. केंद्र सरकारला सत्तेचा गर्व झाला आहे. हुकूमशाही पद्धतीने लाठी हल्ला करून अमानुषपणे विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केला
संसदेमध्ये काँग्रेस नेत्यांना बोलू दिले नाही. म्हणून खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केले .अत्यंत अमानुषपणे त्यांची उचल बांगडी करण्यात आली. त्यांची धरपकड करण्यात आली. देशात लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सरकार करत आहे. जनतेचा आवाज दाबला जात आहे.
आम्ही निवडणुका कशाही जिंकतो हा गर्व सरकारला झाला असून आता जनतेने हे सर्व हातात घेतले पाहिजे. न्यायालय, स्वायत्त संस्था, पत्रकारिता, राजकारणासाठी वापरल्या जात आहेत. युवकांचे भविष्य धोक्यात घातले जात आहे. जाती धर्माच्या नावावर राजकारण सुरू झाले आहे. पुढील काळात लोकशाही राहील की नाही ही चिंता निर्माण झाली आहे.
महात्मा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट बंद करणारे हे लोक असून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिकाही त्यांनी बंद केली. जातीयवाद त्यांनी वाढवला आहे . मात्र आता देशातील युवक जागा झाला असून ही राज्यघटना आणि लोकशाही जपण्यासाठी आता पुन्हा एकदा संघर्षाकरता सर्व युवकांनी एकजुटीने तयार राहा असे आवाहन त्यांनी केले.
तर मा आ डॉ तांबे म्हणाले की, नीट पेपर फुटी हा मोठा भ्रष्टाचार आहे. केंद्र सरकार आणि मंत्र्यांमध्ये कोणतीही नैतिकता उरली नाही .तातडीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होतो आहे. विद्यार्थी जखमी होत आहेत आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. हुकूमशाही पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाहीची हत्या आहे. देशामध्ये दररोज लोकशाहीची हत्या करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी अमोल बोराडे, छात्रभारतीचे तुषार पानसरे,ॲड रंजना गवांदे अनुराधा आहेर, अजित ओरा, यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगति व्यक्त केली. याप्रसंगी काँग्रेस, शहर काँग्रेस, युवा काँग्रेस ,एकविरा फाउंडेशन ,जय हिंद लोक चळवळ, वंचित बहुजन आघाडी, छात्र भारती, एनएसयुआय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय, कम्युनिस्ट ,अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक समाज व विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हजारो नागरिक रस्त्यावर
जंतर-मंतर वरील आंदोलनाला पाठिंबा देत व विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आज समविचारी सर्व पक्ष एकत्र आले. संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो नागरिक महिला युवक रस्त्यावर येऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. संगमनेर शहरातून झालेला विराट मशाल मोर्चा हा मोठा लक्षवेधी ठरला.