९ ऑगस्ट रोजी होणारे ‘चक्काजाम’ आंदोलन नियोजित वेळेनुसारच

लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाची लढाई

 

 

आश्वी । झुंझार न्यूज 

 

 

पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्गाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडचणींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने अखेर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे प्रकल्पाला आता मोठी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, या समितीत डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह रेल्वे बोर्डाचे सदस्य विवेक गुप्ता, पुणे आणि नाशिकचे विभागीय आयुक्त यांचा समावेश आहे. ही समिती प्रामुख्याने खोडद येथील संशोधन केंद्राच्या तांत्रिक बाबींचा आणि रेल्वे मार्गाचा सखोल अभ्यास करून पुढील ६० दिवसांत आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. या प्रकल्पाची सर्व माहिती समितीला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘महारेल’वर सोपवण्यात आली आहे.

या निर्णयाचे स्वागत करताना आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले की, २५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण हा प्रश्न लावून धरला होता, ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तांबे यांनी या निर्णयाला मोठे यश मानले असले तरी, केंद्र सरकारपर्यंत जनभावना पोहोचवण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी ‘क्रांती दिनी’ होणारे चक्काजाम आंदोलन नियोजित वेळेनुसारच होईल, असे स्पष्ट केले आहे. “हे आंदोलन कोणा व्यक्तीच्या विरोधात नसून रेल्वे मंत्रालयाला जागे करण्यासाठी आहे,” असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, जलसपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पावसाळी अधिवेशनात त्यांनी नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नी तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. “जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आहे,” असे विखे पाटील यांनी सांगितले.

प्रकल्प मार्गी लागत असतानाच आता स्थानिक राजकारणात श्रेयवादाची लढाईही सुरू झाली आहे. “ज्यांनी सत्ता आल्यावर रेल्वेचा मार्ग बदलला, तेच आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका रेल्वे संघर्ष समितीने केली आहे. संगमनेर तालुक्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या भावनेने नागरिकांनी ९ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. 

पुणे-नाशिक हा सरळ रेल्वे मार्ग सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर आणि चाकण यांसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक आणि शेतीप्रधान क्षेत्रांना जोडणार आहे. यामुळे व्यापार, शिक्षण आणि रोजगाराच्या संधीत मोठी वाढ होणार असून उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा हा मार्ग ‘कणा’ ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *