​नगर । झुंझार न्यूज

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम अखेर बुधवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी उशिरा अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. येत्या सोमवारपासून (२८ सप्टेंबर) प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. 

 
​प्रतिष्ठेची लढत आणि राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

​अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो, ती नेहमीच राज्यभरात चर्चेचा विषय ठरते. राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वजनामुळे जिल्हा बँकेची ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. बँकेतील संचालक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने गेल्या आठवड्यापासूनच निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 

 
​निवडणुकीची मुख्य आकडेवारी:

​एकूण जागा (संचालक मंडळ): २१ 

​एकूण पात्र मतदार: ३,८३६ सभासद 
​तपशीलवार निवडणूक कार्यक्रम:
​उमेदवारी अर्ज दाखल करणे: २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ 
​अर्जांची छाननी: ६ ऑक्टोबर २०२६ 
​अर्ज माघारीची मुदत: ७ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ 
​निवडणूक चिन्ह वाटप: २२ ऑक्टोबर २०२६ 
​मतदानाचा दिनांक व वेळ: २ नोव्हेंबर २०२६ (सकाळी ८:०० ते दुपारी ४:००) 
​मतमोजणी व निकाल: ३ नोव्हेंबर २०२६ 

 
​निवडणूक बिनविरोध होणार का?

​दरम्यान, जिल्हा बँकेची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचे पडद्यामागे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. तथापि, प्रत्यक्ष अर्जांची छाननी आणि माघारीच्या मुदतीनंतरच चित्राची स्पष्टता होईल. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.   

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *