स्वर्गीय शिवाजीराव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या ३०० सभासदांना प्रतिलिटर ५ रुपये २० पैसे लाभ; दूध संघ, संस्था, अनामत व चढ-उतार निधीचा लाभ
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील स्वर्गीय शिवाजीराव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांची यंदाची दिवाळी आनंदात साजरी होत आहे. संस्थेच्या माध्यमातून सभासदांना रिबेट, अनामत, किंमत चढ-उतार निधी व दूध पेमेंट अशा विविध माध्यमांतून एकूण ६८ लाख १६ हजार ६३४ रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम सभासदांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली असून, प्रतिलिटर ५ रुपये २० पैसे रिबेट मिळाल्याने दूध उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतची माहिती संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे संचालक विक्रमराजे थोरात व संस्थेचे चेअरमन गणेश जाधव यांनी दिली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादक सभासदांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात रिबेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पानोडी येथील स्वर्गीय शिवाजीराव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या एकूण ३०० सभासदांना प्रतिलिटर ५ रुपये २० पैसे याप्रमाणे रिबेटचे वाटप करण्यात आले. यामध्ये दूध संघाकडून १ रुपया, दूध संस्थेकडून १ रुपया, किंमत चढ-उतार निधीतून २० पैसे, तर अनामत रकमेच्या माध्यमातून ३ रुपये असा लाभ सभासदांना देण्यात आला आहे.
दूध उत्पादक शेतकरी हा सहकार व्यवस्थेचा मुख्य आधार असून, त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि सणासुदीच्या काळात कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व सभासदांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्यात आल्याने पारदर्शकतेलाही प्राधान्य देण्यात आले आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन गणेश जाधव, व्हाईस चेअरमन देवराम हजारे, संचालक विनायकराव थोरात , बाळासाहेब नागरे, विठ्ठल घोडेकर ,बाळासाहेब तळेकर, दत्तात्रय चव्हाण , संदिप थोरात , गोरख मुंढे , भाऊसाहेब मुंढे , भास्कर कदम , सौ रोहीनीताई पाबळ , सौ अलकाताई सानप , सचिव एकनाथ नागरे , सहाय्यक मारुती पाबळ , अनिकेत वाकचौरे आदी उपस्थित होते.
दूध उत्पादकांच्या कष्टाचा सन्मान आणि सहकाराच्या माध्यमातून आर्थिक आधार देण्याच्या या उपक्रमामुळे पानोडीतील दूध उत्पादक सभासदांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.