आश्वी खुर्द पोस्ट ऑफिसमधून जर्मनीला दिवाळी फराळ रवाना,ग्रामीण भागातही आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

दिवाळी म्हणजे आनंदाचा, आपुलकीचा आणि नात्यांमधील गोडवा जपण्याचा सण.नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने अनेकजण परदेशात स्थायिक झाले आहेत. मात्र, हजारो किलोमीटर दूर असतानाही त्यांची दिवाळीची ओढ असते ती मायदेशातील घरची, आईच्या हातच्या फराळाची आणि कुटुंबीयांच्या प्रेमाची. हाच प्रेमाचा गोडवा आता भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहोचणार आहे.

आश्वी खुर्द येथील रहिवासी श्री. हौशीराम गायकवाड यांनी जर्मनी येथे स्थायिक असलेल्या आपल्या लेक -जावई यांच्यासाठी घरचा दिवाळी फराळ आश्वी खुर्द उपडाकघरातून आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टद्वारे पाठविला. ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमधूनच परदेशात फराळ पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

पूर्वी आंतरराष्ट्रीय पार्सल पाठविण्यासाठी शहरातील मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा खासगी कुरिअर सेवेकडे जावे लागत असे. मात्र, भारतीय डाक विभागाने आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवेचा विस्तार ग्रामीण भागापर्यंत केला असून आता उपडाकघरांसह शाखा डाकघरांमधूनही ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना घरचा फराळ, भेटवस्तू आणि इतर वस्तू पाठविणे अधिक सोयीचे झाले आहे.

खासगी कुरिअरच्या तुलनेत भारतीय डाक विभागाचे वाजवी दर, विश्वासार्ह सेवा, ऑनलाइन ट्रॅकिंग आणि मोफत पिकअप यांसारख्या सुविधांमुळे नागरिकांचा आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टकडे कल वाढत आहे. विशेष म्हणजे, या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही जागतिक टपाल सेवेचे दार खुले झाले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने घरापासून दूर असलेल्या मुला-मुलींपर्यंत आईच्या हातच्या फराळासोबत प्रेम, माया आणि आठवणी पोहोचविण्याचे काम भारतीय डाक विभाग करीत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी केवळ घराघरांतच नव्हे, तर सातासमुद्रापारही फराळाच्या गोडव्याने साजरी होणार आहे.

 आता गावातूनच परदेशात पाठवा फराळ

“आज ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांतील मुले-मुली शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांसारख्या देशांत स्थायिक आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना घरचा फराळ व भेटवस्तू पाठविण्यासाठी आता तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही.ग्रामीण पोस्ट ऑफिसमधूनही आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.”

– अमोल गवांदे
सब पोस्टमास्तर, आश्वी खुर्द

श्रीरामपूर विभागात आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार

“श्रीरामपूर विभागातील प्रत्येक उपडाकघर तसेच शाखा डाकघरात आंतरराष्ट्रीय टपाल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय श्रीरामपूर प्रधान डाकघर येथे नुकतीच विशेष पार्सल पॅकेजिंगची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण अन शहरी भागातील नागरिकांनी भारतीय डाक विभागाच्या या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा.”

– उमेश जनवाडे
डाक अधीक्षक, श्रीरामपूर विभाग

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *