कॉल करताना समोरच्याचा आवाजही ऐकू येईना; संतप्त ग्राहकांचा जिओला रामराम करण्याचा निर्णय!
आश्वी । झुंझार न्यूज
जिओ कंपनीकडून 5G नेटवर्कचा मोठा गाजावाजा केला जात असताना प्रत्यक्षात मात्र अश्वी आणि परिसरातील ग्राहकांना नेटवर्कच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. मोबाईलमध्ये 5G नेटवर्क दिसत असले, तरी इंटरनेटचा वेग 2G सारखा मिळत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, मोबाईलवरून कॉल केल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा आवाजही व्यवस्थित ऐकू येत नसल्याने ग्राहकांचा संयम सुटू लागला आहे.
संगमनेर तालुक्यातील अश्वी आणि परिसरात जिओचे नेटवर्क दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. कॉल लावल्यानंतर आवाज न येणे, संभाषणादरम्यान आवाज तुटक येणे, वारंवार कॉल ड्रॉप होणे, तसेच इंटरनेट सुरू असूनही कोणतेही पेज ओपन न होणे, अशा अनेक समस्यांनी ग्राहक अक्षरशः हैराण झाले आहेत.
कंपनीकडून 5G सेवेचा प्रचार केला जात असला, तरी प्रत्यक्ष अनुभव मात्र ग्राहकांच्या अपेक्षांच्या अगदी विरुद्ध असल्याचे चित्र आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर 5G नेटवर्क दिसते; मात्र इंटरनेटचा वेग अत्यंत संथ असल्याने ग्राहकांना साधी ऑनलाइन कामे करतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या नेटवर्क समस्यांचा फटका विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शासकीय ऑनलाइन सेवा, बँकिंग व्यवहार, व्यावसायिक कामे आणि दैनंदिन संवाद व्यवस्थेलाही बसत आहे. नियमित रिचार्ज करूनही अपेक्षित सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप वाढत आहे.
संतप्त ग्राहकांचा जिओला रामराम करण्याचा विचार!
नेटवर्कच्या सततच्या समस्यांना कंटाळून अनेक ग्राहकांनी आता दुसऱ्या मोबाईल नेटवर्ककडे वळण्याची तयारी सुरू केली आहे. काही ग्राहकांनी तर दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट करण्यासाठी पोर्टिंगचे एसएमएस केल्याचे समजते. त्यामुळे जिओ कंपनीने वेळीच नेटवर्कची गुणवत्ता सुधारली नाही, तर अश्वी परिसरातील ग्राहक गमावण्याची वेळ कंपनीवर येऊ शकते.
5G चा गाजावाजा कशासाठी? ग्राहकांचा सवाल!
5G सेवेच्या नावाखाली ग्राहकांकडून नियमित रिचार्जचे पैसे घेतले जात असताना साधी कॉलिंग आणि इंटरनेट सेवा देखील समाधानकारक मिळत नसेल, तर ग्राहकांनी नेमकी कोणाकडे दाद मागायची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जिओ कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अश्वी व परिसरातील नेटवर्क समस्येची तातडीने दखल घेऊन तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. तसेच ग्राहकांना अखंडित कॉलिंग आणि वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
आता जिओ कंपनी ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन नेटवर्कमध्ये सुधारणा करणार की संतप्त ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कचा पर्याय स्वीकारावा लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.