संगमनेर तालुक्यात निमोण व तळेगाव गटातील गेल्या दोन वर्षांपासून अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिके पूर्णतः वाया गेली आहेत. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून १००% पिकांचे नुकसान झाले आहे.
२०२४-२५ या वर्षासाठी दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्याचा लाभ अनेक भागांना मिळाला, मात्र संगमनेर तालुक्याचा समावेश न झाल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे.
त्यामुळे २०२४-२५ हे वर्ष वगळून २०२५-२६ या वर्षासाठी संगमनेर तालुका संपूर्ण दुष्काळग्रस्त घोषित करून विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भाऊसाहेब सोनवणे यांनी कृषी मंत्री मा. दत्ता भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, निमोण तळेगाव गट व साकूर पठार भाग हा कायमच दुष्काळग्रस्त असून याचा गांभीर्याने विचार करावा. अतिवृष्टी व कमी पावसामुळे जनावरांसाठी चारा व पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून संगमनेर तालुक्यासाठी २०२५-२६ करिता दुष्काळ निधी व विशेष सहाय्य पॅकेज मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
याप्रसंगी, संगमनेर मतदार संघाचे आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे, आकाश चकोर, डॉ. संतोष डांगे, उत्तम दिघे, दत्तात्रय दिघे, सुशांत आंधळे, निमोण व तळेगाव गटातील महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.