{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंझार न्यूज

 

मला आठवते त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझ्या आईला विड्या बांधताना पाहत आलो आहे. हा प्रसंग सांगण्याचे कारण म्हणजे आईच्या या कामाचे आणि दिवाळीचे वर्षानुवर्षांचे एक अतूट नाते जोडले गेले आहे. वर्षभर विड्या बांधून मिळणाऱ्या मोबदल्यासोबतच दिवाळीच्या सणाला आईला बोनस मिळायचा. याच बोनसच्या पैशांवर आमच्या घरची दिवाळी साजरी व्हायची. आज मी स्वतः कमावता झालो आहे. मलाही बोनस मिळतो; पण आईला त्या काळात मिळणाऱ्या बोनसचे अप्रूप आजही माझ्या मनात कायम घर करून आहे.

खरं तर आईच्या हाताला लागलेला कष्टाचा गंध आणि तिच्या घामातून उभे राहिलेले संसाराचे विश्व यांची तुलना जगातील कोणत्याही संपत्तीशी होऊ शकत नाही. बोनसची खाकी कागदाची चिट्ठी म्हणजे केवळ बोनसची पावती नव्हती, तर वर्षभर केलेल्या कष्टांची पावती होती. त्या चिठ्ठीत आईच्या मेहनतीचा हिशोब होता, मुलांच्या नवीन कपड्यांची स्वप्न होती, दिवाळीच्या फराळाचा आनंद होता आणि आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची एका आईची धडपड होती.

ते माझ्या बालपणीचे दिवस होते. घरची परिस्थिती बेताची होती. वडील गवंडी काम करायचे, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आई विड्या बांधण्याचे काम करायची. आईने कष्टाने कमावलेल्या या पैशांतून आमचे बालपण समृद्ध होत गेले. त्यावेळी गरज म्हणून सुरू केलेले हे विडी काम आई आजही जमेल तसे करत आहे. कारण याच व्यवसायाच्या आधारावर तिने आमचे कुटुंब उभे केले, याची जाणीव आणि कृतज्ञता तिच्या चेहऱ्यावर आजही स्पष्ट दिसते.

दिवाळीच्या काळात आईला बोनस मिळायचा. बोनसची रक्कम आजच्या तुलनेत अत्यल्प असली, तरी त्या काळात तिचे मोल खूप मोठे होते. वर्षभरात तिने किती विड्या बांधल्या, यावर तिच्या बोनसची रक्कम ठरायची. विडी कारखान्यातील कारकून एका खाकी कागदाच्या चिठ्ठीवर बोनसची रक्कम लिहून द्यायचा. त्यानंतर सर्व कामगारांना रोख स्वरूपात पैसे मिळायचे. ती खाकी चिठ्ठी हातात घेऊन पैसे घेण्यासाठी विडी कामगार महिलांची एकच रांग लागलेली असायची.

या बोनसच्या वेळी प्रत्येक लहान मूल आपल्या आईसोबत कारखान्यात आलेले असायचे. संपूर्ण विडी कारखाना त्या क्षणी आनंदाने न्हाऊन निघालेला असायचा. तो उत्साह, तो आनंद आणि त्या चेहऱ्यांवरील समाधान आजही डोळ्यांसमोर जिवंत आहे. कधी कधी वाटते, ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायला मिळावेत. कारण तो काळ केवळ पैशांचा नव्हता, तर माणुसकी, आपुलकी आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा होता.

आईला मिळणाऱ्या बोनसचा आनंद तर माझ्यासाठी काही वेगळाच असायचा. याच पैशांतून आई घरातील दिवाळीचा किराणा, फटाके आणि आम्हा सर्वांचे नवीन कपडे घ्यायची. बोनसची रक्कम छोटी असली, तरी त्या काळातील स्वस्ताई आणि आईचे काटेकोर नियोजन यामुळे आमची दिवाळी अगदी आनंदात साजरी व्हायची. त्या दिवाळीतील आनंदाची तुलना आजच्या कोणत्याही मोठ्या खरेदीशी होऊ शकत नाही.

आजच्या काळात बोनस म्हणजे बँक खात्यात जमा होणारी काही रक्कम; पण त्या काळातील आईच्या बोनसला भावनांचे एक वेगळेच विश्व जोडलेले होते. त्या पैशांतून घेतलेले नवीन कपडे कदाचित साधे असतील, फटाकेही मोजके असतील; पण त्या प्रत्येक वस्तूमागे आईच्या कष्टांची आणि मायेची श्रीमंती होती. म्हणूनच त्याकाळची दिवाळी आजच्या अनेक सुखसोयींने भरलेल्या दिवाळीपेक्षा अधिक समृद्ध होती.

विड्या बांधणाऱ्या अनेक महिला एकत्र बसून काम करायच्या. काम करताना जुन्या गाण्यांच्या सुरावटी, गाणी, ओव्या, अभंग आणि चारोळ्या ऐकायला मिळायच्या. एकमेकींच्या सुख-दुःखात सहभागी होत, एकमेकींना आधार देत त्या गुण्यागोविंदाने संसार करत होत्या. कामाच्या ठिकाणीही नात्यांचा व माणूसकीचा ओलावा जपणारा तो काळ होता. आज प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त झाला आहे; मात्र त्या महिलांमधील आपुलकी आणि जिव्हाळा आजही आठवणीत कायम आहे. आज आधुनिकतेच्या प्रवासात आपण अनेक भौतिक सुखे मिळवली; पण अशा नात्यांमधील जिव्हाळा आणि आपुलकी कुठेतरी मागे पडत चालली आहे हे तितकेच वास्तव आहे.

या व्यवसायाशी निगडित आणखी एक महत्त्वाची आठवण म्हणजे विडी कामगार महिलांच्या मुलांना शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती. या शिष्यवृत्तीच्या आधारावर अनेक विडी कामगारांची मुले शिकली, मोठी झाली. आज त्यातील अनेक जण अधिकारी, व्यावसायिक म्हणून मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, तर काहींनी देश-विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणजेच एका कष्टकरी आईच्या हातातील विडीने केवळ घराची चूल पेटवली नाही, तर अनेक मुलांच्या शिक्षणाचा दिवाही प्रज्वलित केला. या सर्व यशाच्या पायाभरणीत आईच्या कष्टाचा मोठा वाटा आहे. ही बाब प्रत्येक कष्टकरी आईसाठी निश्चितच अभिमानाची आहे.

आज मागे वळून पाहताना जाणवते की, आईने बांधलेल्या प्रत्येक विडीमध्ये तिचे कष्ट होते, आमच्या भविष्याची स्वप्ने होती आणि कुटुंबासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती.

प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्याच्या इतिहासात कुठेतरी एका आईच्या निशब्द संघर्षाची कहाणी दडलेली असते. मुलांना मोठे करताना आई स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवते; स्वतःच्या गरजा कमी करते; पण मुलांच्या स्वप्नांना कधीच मर्यादा घालत नाही. तिच्या हातातील काम किती साधे असलेतरी तिच्या मनातील स्वप्न मात्र नेहमीच मोठी असतात.

आजही दिवाळी आली की लहानपणीच्या त्या आठवणी जाग्या होतात. बोनसची ती खाकी चिठ्ठी, पैसे घेण्यासाठी लागलेली महिलांची रांग आणि आईच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यांसमोर येतो.

आज आपण कितीही मोठे झालो, कितीही कमावले, कितीही यश मिळवले, तरी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या संघर्षाला आणि आपल्यासाठी कष्ट सोसणाऱ्या हातांना विसरता कामा नये. कारण आईच्या बोनसची रक्कम कदाचित काळाबरोबर संपली असेल; पण त्या पैशांतून मिळालेला आनंद, आईच्या कष्टांतून मिळालेले संस्कार आणि तिच्या त्यागातून मिळालेली आयुष्याची शिदोरी कधीच संपणार नाही.

आज माझ्या हातात कितीही मोठा बोनस आला, तरी आईच्या त्या छोट्याशा बोनसचे मोल कधीच कमी होणार नाही. कारण त्या बोनसच्या पैशांत केवळ रक्कम नव्हती, तर आईचे कष्ट, त्याग आणि आमच्या आनंदाची स्वप्ने सामावलेली होती…!

आईच्या हाताला कामाचा आधार होता, पण त्या हातांनी घडवलेल्या लेकरांच्या आयुष्याला भविष्याचा आकार दिला हीच त्या आईच्या कष्टांची खरी दिवाळी.

लेखक परिचय

मा. मंत्री तथा लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे सोशल मीडिया समन्वयक विशाल मच्छिंद्र काळे यांनी आपल्या आईच्या दिवाळीतील आठवणींना उजाळा देत हा भावस्पर्शी लेख लिहिला आहे. 9881797982

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *