{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी – सौ दुर्गाताई तांबे

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

मातृभाषेविषयी निष्ठा वृद्धिंगत करणे, वाचन संस्कृतीला चालना देणे, मराठी भाषेचा प्रचार – प्रसार करणे तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये साहित्याविषयी सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने संगमनेर येथे सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी मातोश्री लॉन्स ( अकोले बायपास ) या ठिकाणी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती देताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर, समर्थ युवा फाउंडेशन आणि मराठी भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन होत आहे.

सोमवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक डॉ.संजय कळमकर, तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ.स्वाती महाळंक उपस्थित राहणार आहेत. राज्याचे माजी शिक्षण व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, संमेलनास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा संगमनेरचे कार्यवाह डॉ.नितीन संगमनेरकर आणि शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णाताई मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संमेलनात विविध ज्ञान, रंजन आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष डॉ.संजय कळमकर यांचे प्रभावी व्याख्यान होणार आहे. तसेच श्रीमती संगीता पुंडगे यांचा मनोरंजनात्मक ‘बोलक्या बाहुल्या’ हा कार्यक्रम, प्रसिद्ध गायक त्यागराज खाडीलकर व दीपिका जोग यांचा ‘अक्षर गाणी’ हा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. शालेय पाठ्यपुस्तकातील संगीतमय कवितांचे गायन प्रकाश पारखे व विद्यार्थी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन संदीप वाकचौरे करणार असून ध्वनी संयोजनाची जबाबदारी संतोष गोटस्कर यांच्यावर आहे.

संमेलनात राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व लेखक योगेश सोमण यांचा ‘ज्योती’ हा लघुपट आणि मराठी भाषा संचालनालयाचा माहितीपट दाखविण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर ही संस्था २०१० पासून साहित्य, संस्कार, संस्कृती, ज्ञान आणि कला विषयक विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी यांचे या उपक्रमांना सहकार्य लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेरचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेरला या बालकुमार साहित्य संमेलनाचा बहुमान मिळाला आहे. आगामी २०२७ मध्ये पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे १०० वे साहित्य संमेलन होणार असून, त्यानंतरचे १०१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२८ मध्ये संगमनेर येथे व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुर्गाताई तांबे यांनी सांगितले.

या साहित्य संमेलनात संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांचे प्रतिनिधी, सर्व पत्रकार बांधव सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि मराठी भाषेबद्दल आत्मीयता वाढविणे हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

संमेलन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अनिल देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. विवेक वाकचौरे, कार्याध्यक्ष अरविंद गाडेकर, सचिव दर्शन जोशी, कोषाध्यक्ष अरुण तिळे, सहसचिव चारुदत्त काटकर तसेच सदस्य शशांक गंधे, प्रकाश पारखे, अनिल सोमणी आणि ओंकार बिहाणी प्रयत्नशील आहेत.

तरी या एकदिवसीय साहित्य संमेलनात संगमनेर शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकुमार साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *