ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे रावसाहेब घुगे यांचा आंदोलनाचा इशारा
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरात सध्या माशांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. गावातील पोल्ट्री व्यवसायामुळे माशांची संख्या प्रचंड वाढली असून, यामुळे मानवी आरोग्यासह मुक्या जनावरांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरवली असून, प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पानोडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून माशांचा मोठा ‘गंज’ निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील पोल्ट्री फार्म मालक योग्य ती खबरदारी घेत नाहीत. पोल्ट्रीमध्ये साचणाऱ्या विष्ठेची आणि कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने, तिथे मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होत आहे. यामुळे संपूर्ण गावात माशांचे साम्राज्य पसरले आहे.

माशांच्या या सुळसुळाटामुळे ग्रामस्थांना घरात शिजवलेले अन्न खाणेही कठीण झाले आहे. अन्नपदार्थांवर सतत माशा बसत असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ मानवावरच नव्हे, तर याचा मोठा फटका दुभत्या जनावरांनाही बसत आहे. माशांच्या त्रासामुळे गाई-म्हशींसारखी जनावरे सतत आजारी पडत आहेत, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदने दिली आहेत. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन पोल्ट्री चालकांवर कारवाई करण्यास किंवा गावात प्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या परिस्थितीवर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे म्हणाले की, “पानोडी गावातील नागरिकांचे जगणे माशांमुळे असह्य झाले आहे. अन्न खाणेही मुश्किल झाले असून जनावरे आजारी पडत आहेत. पोल्ट्री चालकांच्या मनमानी कारभारामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे. जर ग्रामपंचायतीने आणि संबंधित विभागाने या माशांचा तातडीने बंदोबस्त केला नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल.”
आता या इशाऱ्यानंतर तरी ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभाग जागे होणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
.


