कारभारी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन; एकलव्य संघटनेचा प्रशासनाला इशारा
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथे आदिवासी समाजाच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण करून, पीडित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी आणि महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने ‘ॲट्रासिटी’सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी ‘एकलव्य संघटना महाराष्ट्र’च्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कौठे-मलकापूर येथील गट नं. १७/४० मध्ये गणपत विठ्ठल पवार, मच्छिंद्र गणपत पवार, गोरख गणपत पवार आणि सुकदेव गणपत पवार यांच्या मालकीची ‘भोगवटा वर्ग २’ ची ६ हेक्टर ४० आर इतकी जमीन आहे. ही जमीन पवार कुटुंबाला १० जानेवारी १९५९ रोजी प्राप्त झाली असून, ३१ मार्च १९५९ पासून ते आजतागायत तीन पिढ्यांपासून या जमिनीची मशागत करत आहेत. सदर जमीन गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असल्याने, याचा गैरफायदा घेत कारभारी गणपत शिंदे व त्यांच्या मुलांनी या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे.
पवार कुटुंबाने जेव्हा आपल्या जमिनीबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपी कारभारी शिंदे आणि त्यांच्या मुलांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली. इतकेच नव्हे तर, कुटुंबातील स्त्रियांना आणि लहान मुलींनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित कुटुंबाचा उदरनिर्वाह याच जमिनीवर अवलंबून असताना, आरोपींनी त्यांना शेतात जाण्यापासून रोखले असून धक्काबुक्की व मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
याच गटात वडारी समाजातील काशिनाथ दुर्गा शिंदे यांचीही जमीन आहे. मात्र, ते इसम सध्या बाहेरगावी राहत असल्याने, केवळ आडनावातील साधर्म्याचा फायदा घेऊन आरोपी कारभारी शिंदे यांनी पवार कुटुंबाच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार फसवणुकीचा असून आदिवासी कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार सुभाष कदम, प्रांताधिकारी अरुण उंडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आरोपींवर ॲट्रासिटी, फसवणूक, अतिक्रमण आणि विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल करून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
यावेळी एकलव्य संघटनेचे तालुका प्रमुख भाऊसाहेब माळी, महादेव कोळी आघाडी प्रमुख बाळकृष्ण दरेकर, कार्याध्यक्ष महेश बर्डे, आश्वी शाखाध्यक्ष उत्तम जाधव, गोरख बर्डे, टायगर फोर्स कार्याध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.